फडणवीस-गडकरी यांचा पुढाकार : काटोलचा संत्रा प्रक्रिया उद्योगही सुरू करणारनागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगगुरू रामदेबबाबा धावून आले आहेत. भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा फूड पार्क नागपुरात उभारण्याची तयारी रामदेवबाबांनी दर्शविली आहे. याशिवाय काटोल येथे बंद पडलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची व अमरावती येथेही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासही ते इच्छुक आहेत. या प्रकल्पांसाठी त्यांनी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली असून, सरकारनेही जागा देण्याची तयारी चालविली आहे.जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय भवनासमोर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस व गडकरी या दोन्ही नेत्यांनी संबंधित घोषणा केली. गडकरी म्हणाले, रामदेवबाबा आपल्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी चर्चेत त्यांनी नागपुरात फूड पार्क उभारण्याची व काटोलचा बंद पडलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात येऊन मिहानमधील जागेची व काटोलच्या प्रकल्पाची पाहणी केली. चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती परिसरातील जंगल भागात मोठ्या प्रमाणात वनौषधीचे उत्पादन होते. ही वनौषधी खरेदी करावी, अशी विनंती आपण रामदेवबाबा यांना केली. त्यांनी ती मान्य करीत नागपूर व अमरावती येथे वनौषधी प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली. नागपुरात जागा मिळाल्यास १२ एकर जागेवर आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
रामदेवबाबा उभारणार नागपुरात फूड पार्क
By admin | Published: February 07, 2016 2:51 AM