नागपूर : काेराेनाचे सावट कायम आहे, मुख्य साेहळा हाेणार नसल्याची घाेषणा झाली, शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या, काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे. एवढेच नाही तर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवेश नाकारला गेला आहे. अशा परिस्थितीत नियमांचा सन्मान राखत आणि सर्व अडचणी पार करीत भीम अनुयायांचे जथ्ये दीक्षाभूमीकडे वळू लागली असून हा परिसर पुन्हा निळ्या पाखरांनी फुलू लागला आहे. (The footsteps of pilgrims turned towards Deekshabhoomi; Even if there is no event, the attraction remains)
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टाेबर १९५६ राेजी रक्ताचा थेंबही न सांडविता ऐतिहासिक क्रांती केली. आपल्या काेट्यवधी शाेषित पीडित समाजाला तथागत गाैतम बुद्ध यांचा प्रकाशमय धम्म दिला आणि नवा जन्म व्हावा तसा या समाजाच्या आयुष्यात परिवर्तन घडले. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यावर्षी ६५ वा वर्धापन दिन आहे. मागील दाेन वर्षापासून साऱ्या जगावर काेराेना महामारीचे सावट पसरले हाेते. साऱ्या प्राण्यांना बंदी बनविणारा माणूस पहिल्यांदा बंदिस्त झाला. सर्वत्र टाळे लागले असताना दीक्षाभूमीचे द्वारही बंद झाले हाेते. मागील वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या परिसरात शुकशुकाट पसरला हाेता. त्यानंतरही कुठलाच कार्यक्रम हाेऊ शकला नाही. भीम अनुयायांना बाहेरूनच अभिवादन करतानाचे दृश्य अनुभवले आहे.
आता सार निस्तरायला लागलं आहे आणि येथे येऊन बाबासाहेबांना, तथागत बुद्धाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांचे प्राण कंठाशी आले आहेत. मात्र महामारीचे सावट कायम असल्यामुळे प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य साेहळा रद्द केला. मात्र आतमध्ये अभिवादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रम नसला तरी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावून पुन्हा नवी ऊर्जा घेण्याचा उत्साह अनुयायांमध्ये संचारला आहे. त्यामुळे बुधवारपासूनच देशभरातील लाेक जत्थ्याने दीक्षाभूमीकडे पाेहचायला लागली आहेत. बाैद्ध भिक्खू, पाठीवर बॅग लावलेले तरुण आणि डाेक्यावर भाकरीचे गाठाेडे घेतलेली माणसे ओढेने येऊ लागली आहेत. या भूमीतून पुस्तकांचे गाठाेडे आणि ज्ञानाचा प्रकाश घेऊन जाण्यासाठी ती आली आहेत आणि दाेन वर्षाच्या सुनेपणानंतर पुन्हा क्रांतिभूमीचा परिसर फुलला आहे.
गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
दीक्षाभूमीवर गर्दी हाेणार नाही यासाठी प्रशासन त्यांच्याकडून प्रयत्न करीत आहे. तसे आवाहन करण्यात आले. मात्र अनुयायांचे आगमन हाेणारच, ही शक्यता जाणून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीही प्रशासन सज्ज आहे. पाेलीस विभागाने आपली जबाबदारी स्वीकारली असताना मनपा व जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययाेजना केली जात आहे. दीक्षाभूमीच्या चारही गेटकडे बॅरिकेड लावण्यात आले आहेत. दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.