सुनील चरपे
नागपूर : यंदा मान्सून रेंगाळला असून, पहिल्या टप्प्यात काॅटन बेल्ट असलेल्या पूर्व विदर्भासह जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कापूस हे दुष्काळ सहनशील पीक असून, या पिकाला सरासरी ६०० ते ७५० मिमी पावसाची गरज असल्याने पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी काेसळला तरी कापूस उत्पादकांनी चिंता करू नये, अशी माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली.
कपाशीचे पीक दुष्काळ सहनशील असून, भारी व काळीच्या जमिनीत ते किमान १५ ते २० दिवस आणि हलक्या जमिनीत आठवडाभर पावसाचा खंड व पाण्याचा ताण सहन करू शकते. सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान सरासरीपेक्षा १९ टक्के कमी अथवा १९ टक्के अधिक राहिल्यास दाेन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये कपाशीचे पीक चांगले येते. परंतु, या काळात तापमान किमान १५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणे आवश्यक आहे.
पावसाचे प्रमाण यापेक्षा कमी अथवा अधिक झाल्यास पिकाचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. अधिक पाऊस झाल्यास जमिनीत पाण्याचा याेग्य निचरा हाेत नसल्याने यवतमाळ, अमरावती, अकाेला, नागपूर व जळगाव जिल्ह्यातील कपाशीसाठी धाेक्याची सूचना ठरू शकते. वर्धा जिल्ह्यातील माती वाळूयुक्त असल्याने हा जिल्हा अपवाद ठरताे, असेही यवतमाळ येथील कापूस उत्पादक शेतकरी मिलिंद दामले यांनी सांगितले.
मातीची सच्छिद्रता महत्त्वाची
पिकांची उत्तम वाढ आणि चांगल्या उत्पादनासाठी मातीची सच्छिद्रता महत्त्वाची आहे. यासाठी मातीच्या छिद्रांमध्ये ५० टक्के पाणी व ५० टक्के हवा असायला पाहिजे. पिकांची मुळे या छिद्रांमधून हवेतील ऑक्सिजन शाेषून घेत असून, काॅर्बन डायऑक्साईड हवेत साेडतात. त्यामुळे जमिनीत कार्बाेलिक ॲसिड तयार हाेऊन जमिनीतील जैविक प्रक्रिया वाढते व मुळे पाेषक अन्नद्रव्ये शाेषून घेतात. पाऊस अधिक झाल्यास ही छिद्रे पाण्यामुळे बुजतात व पिकांना हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी हाेत असल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावते. शिवाय, जमिनीत बुरशी तयार हाेते. त्याचा पिकांच्या वाढीसाेबतच उत्पादनावर विपरीत परिणाम हाेताे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयाेग्य ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास तसेच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी. पाण्याच्या याेग्य निचऱ्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. जलसंधारणासाठी मुख्य मशागतीची कामे उताराला आडवी अथवा कंटूर रेषेला करावी.
- डाॅ. सचिन वानखेडे, विषय विशेषज्ञ,
हवामान शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र,
केंद्रीय कापूस संशाेधन संस्था, नागपूर.