नागपूर : मेहंदी लागली. आज हळद लागेल अन् उद्या लग्नसोहळा पार पडून सप्तपदी घेतील अन् ‘त्या’ पाच जणींच्या आयुष्याची रेशीमगाठ बांधली जाईल. श्रद्धानंदपेठेतील श्रद्धानंद अनाथाश्रम सध्या आनंदाने फुलले आहे आणि पाचही जणी माहेरपण सोडून सासरी जाणार असल्याने हुरहूर ही राहणार आहे. पण, अनाथ म्हणून असलेली ओळख कायमची मिटणार आहे. इथून त्यांचे आयुष्यच नवे वळण घेणार आहे. एका अर्थाने त्यांच्यासाठी हा नवा जन्मच जणू.
आजवर अनाथ म्हणूनच जगणाऱ्या या मुलींना अनाथालयाचा आधार, माया आणि त्यांच्यासारख्याच मुलांची साेबत हाेती. मात्र हक्काची म्हणावी ते आईवडील आणि आपले म्हणावे असे हक्काचे घर नव्हते. ही आपलेपणाची भावना पहिल्यांदा त्यांना आता मिळणार आहे. आपला म्हणावा असा जाेडीदार, त्याचे आईवडील, नातेगाेते आणि हक्काचे म्हणावे ते घरही त्यांच्यासाठी आनंदपर्व राहणार आहे.
श्रद्धानंद अनाथालयाच्या दारात मांडव सजला आहे. गुरुवारी थाटात मेहंदी साेहळा पार पडला. पाच भावी वधूंसह अनाथालयातील चिमुकल्यांचेही हात मेहंदीने रंगले. शुक्रवारी हळद आणि संगीत कार्यक्रम हाेणार आहे आणि १८ जून राेजी सकाळी १०.३० वाजता थाटात लग्नसाेहळा पार पडणार आहे. अनाथालयासाठी ही वेळ जेवढी आनंदाची तेवढीच हृदय दाटून येणारी आहे. इतके वर्षे या अनाथाश्रमाच्या आधाराने राहणाऱ्या या पाच मुली हे माहेर साेडून सासरी जाणार आहेत. २३ वर्षांची मनीषा २१ वर्षांची उषा व संताेषी, २५ वर्षांची सेविका यांना येथे आणले तेव्हा त्या एक-दाेन वर्षाच्या अबाेध बालिका हाेत्या. सीमाला १२व्या वर्षी दुसऱ्या अनाथाश्रमातून येथे आणले हाेते. तेव्हापासून त्यांचे पालनपाेषण, शिक्षण, आराेग्य येथे झाले. लहानपणी चालण्याचा त्रास असलेल्या सेविकाच्या पायाचे २००४ व २००८ मध्ये दाेन ऑपरेशन झाले. सीमाच्या डाेळ्याचे ऑपरेशन झाले. अठरावे पूर्ण केल्यानंतर या मुलींना आधारगृहात दाखल करण्यात आले. इतकी वर्षे या ठिकाणी राहणाऱ्या या पाचही जणी कर्मचाऱ्यांसाठी मुली, चिमुकल्या अनाथांसाठी ताई आणि कुणाच्या मैत्रिणी झाल्या. चांगल्या वाईट असंख्य आठवणी असतील. या सगळ्या आठवणी साेबत घेऊन त्या नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. मग येथील प्रत्येकाच्या भावना दाटून येणार नाहीत तर नवलच.
यांच्याशी हाेणार विवाह
मनीषाचा विवाह धरणगाव, मलकापूर, जि. बुलडाणातील मुलाशी हाेणार आहे. उषाचे लग्न यवतमाळचे दिनेश भेंडारकर यांच्याशी, सेविकाचे लग्न मध्य प्रदेशातील कपिल शर्मा यांच्याशी, संताेषी ही खामला येथील सचिन भाेयर यांच्याशी तर सीमाचे लग्न उमाळी, जि. बुलडाणाचे सतीश धाेरण यांच्याशी हाेणार आहे. अनाथालयाच्या कर्मचाऱ्यांनी वधू पक्षाच्या कुटुंबाप्रमाणे आवश्यक असलेला पाठपुरावा, कागदपत्र व आराेग्य तपासणी करूनच लग्न ठरविल्याची माहिती अर्चना मेश्राम यांनी दिली.
हे करणार कन्यादान
शहरातील प्रतिष्ठित किशाेर धाराशिवकर, राजकुमार गुप्ता, दीपा पचाेरी, मनीषा यमसनवार व पाले बलजीत भुल्लर हे पाचही मुलींचे कन्यादान करणार आहेत. काही दानदात्यांनी मुलींच्या नावे एफडी केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशाेमती ठाकूर या आवर्जून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे पदाधिकारी आणि अनाथालयाचे कर्मचारी उत्साहाने या विवाहसाेहळ्याच्या तयारीला लागले आहेत.