नागपूर : कशाचाही स्पर्श न करता स्तन किंवा मुखाच्या कर्करोगाचे संशयित रुग्ण शोधणे आता आणखी सोपे झाले आहे. अत्याधुनिक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित दोन यंत्रे दानशूर व्यक्तीनी राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, राज्यात केवळ नागपुरातच ही यंत्रे उपलब्ध झाली आहेत.
पहिल्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो. त्यामुळे संशयित रुग्णांना शोधण्यासाठी ही दोन्ही यंत्रे फायद्याची ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतार सिंग म्हणाले की, संशयित स्तन कर्करोगाचे रुग्ण शोधणाऱ्या यंत्राचे नाव ‘थर्मालिटिक्स’ आहे. रुग्णाला स्पर्श न करता, जवळपास एक मीटरच्या अंतराने हे यंत्र स्तनामध्ये गाठ असल्यास त्याचे अवलोकन करून अहवाल देते. त्यानंतर ‘बायोप्सी’द्वारे कर्करोगाचे निदान केले जाते. आतापर्यंत या यंत्रातून २०० महिलांची तपासणी करण्यात आली. यातून ५० संशयित महिलांचा शोध घेऊन त्याची ‘बायोप्सी’ करण्यात आल्यानंतर तीन महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.
ब्रशसारखे यंत्र
मुख कर्करोगाचे तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध वाघ म्हणाले की, संशयित रुग्ण ओळखण्यासाठी ब्रशच्या आकारातील ‘ओरल स्कॅन’ नावाचे हे यंत्र आहे. हे यंत्र तोंडात फिरविले जाते. तोंडातील चट्ट्याची नोंद हे संगणकात करते. संशयानुसार रुग्णाची ‘बायोप्सी’ केली जाते. यातून २५० जणांची तपासणी करण्यात आली. त्यातून ३३ संशयित आढळले. ‘बायोप्सी’नंतर पाच रुग्णांना मुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.