नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या गटाला ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर गटाला अपेक्षेनुसार पुढील वाटचाल करण्यासाठी, ते शिवसेना आहेत, हे सर्वात आधी विधानसभा अध्यक्षांपुढे सिद्ध करावे लागेल, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
शिंदे गटानुसार त्यांना विद्यमान सरकारसोबत राहायचे नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:चा वेगळा गट निर्माण केला आहे. दुसरा गट उद्धव ठाकरे यांचा आहे. शिंदे यांच्या गटात ४० पेक्षा जास्त आमदार असतील तर, ठाकरे यांचा गट अल्पमतात येतो. त्यामुळे शिंदे गट शिवसेना पक्षावर दावा करू शकतो. त्याकरिता त्यांना विधानसभा अध्यक्षांकडे दावा दाखल करावा लागेल. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून यावर निर्णय द्यावा लागेल. ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची हे अध्यक्षांवर अवलंबून आहे. दावा सिद्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्री पुरावे सादर करून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक आमदाराला अध्यक्षांपुढे प्रत्यक्ष उपस्थित राहून शिंदे गटासोबत असल्याचे मान्य करावे लागेल. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाली तर, त्यांना विद्यमान सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येईल, असे ॲड. अणे यांनी सांगितले.