खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका
By कमलेश वानखेडे | Published: April 12, 2024 05:06 PM2024-04-12T17:06:12+5:302024-04-12T17:07:51+5:30
आज साकोलीत राहुल गांधी यांची तर रविवारी खरगे यांची नागपुरात सभा.
कमलेश वानखेडे, नागपूर : पहिल्या टप्प्यात मतदान होऊ घातलेल्या पूर्व विदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व नेते राहुल गांधी हे प्रचाराचा धडाका सुरू करणार आहेत. राहुल गांधी यांची शनिवारी साकोली येथे जाहीर सभा होत असून ही त्यांची राज्यातील पहिली प्रचार सभा आहे. १४ एप्रिल रोजी खरगे यांची नागपुरात जाहीर सभा होईल. प्रियंका गांधी यांच्या चंद्रपूर दौऱ्याबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली या मतदारसंघातून राहुल गांधी हे राज्यातील प्रचाराचा शुभारंभ करीत आहेत. राहुल गांधी यांचे शनिवारी दुपारी ३.१५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमत होईल. येथून ते हेलिकॉप्टरने साकोलासाठी रवाना होतील. दुपारी ४ वाजता आयोजित सभेत सहभागी होतील. यानंतर नागपूरला हेलिकॉप्टरने परत येऊन ते विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील. मल्लिकार्जून खरगे हे रविवारी दुपारी १ वाजता विमानाने नागपुरात दाखल होतील. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ते दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. यानंतर नागपूरचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी मध्य नागपुरातील गोळीबार चौक येथे दुपारी ४ वाजता आयोजित जाहीर सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत.
चंद्रपूरच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी १५ एप्रिल रोजी प्रियंका गांधी यांची सभा होणार होती. मात्र, इतर ठिकाणी सभा असल्यामुळे चंद्रपूरची सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा १६ किंवा १७ एप्रिल रोजी आयोजित करण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.