विकास ठाकरेंसाठी काँग्रेस नेत्यांनी बांधली ‘वज्रमुठ’, रॅली काढून शक्तिप्रदर्शन
By कमलेश वानखेडे | Published: March 26, 2024 06:04 PM2024-03-26T18:04:31+5:302024-03-26T18:05:30+5:30
एकीचे प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल; १६ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित.
कमलेश वानखेडे, नागपूर : नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांनी मंगळवारी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते गटतट सोडून एकत्र आले होते. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोेधात विजयासाठी काँग्रेस नेत्यांनी वज्रमुठ बांधल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले. विशेष म्हणजे, रॅलीत इंडियाआघाडीत सहभागी असलेल्या १६ पक्षांचे नेते, प्रतिनिधी सहभागी झाले.
आ. विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल देशमुख, अनीस अहमद, सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, माजी आ. अविनाश वारजूरकर, प्रकाश गजभिये, अ.भा. काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रवक्ते अतुल लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, डॉ. बबनराव तायवाडे, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, माजी उपम्हापौर शेखर सावरबांधे, अ.भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके, नॅश अली, संजय महाकाळकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर अध्यक्ष नितीन तिवारी, मुजीब पठाण, राजा तिडके, श्रीराम काळे, सुरेश वर्षे, वेदप्रकाश आर्य, प्रकाश वसू, कांता पराते, प्रो. युगल रायलू, दिनेश अंडरसहारे, अरुण वणकर, अरुण लाटकर, जयंत जांभुळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
काँग्रेस नेत्यांच्या एकीचीच चर्चा -
रॅलीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेसचे सर्व नेते एकत्र होते. सर्वांनी एकत्रित फोटोही काढून घेतले. नेत्यांच्या या एकीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये तर होतीच पण जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही होती.
संविधान चौकातून निघाली रॅली -
आ. विकास ठाकरे यांनी सर्वप्रथम व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ठाकरे यांच्यासह सर्व नेते संविधान चौकात जमले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत नेते खुल्या जिप्सीत स्वार झाले. रॅली आकाशवाणी चौकापर्यंत पोहचली. यानंतर प्रमुख नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला.
‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही फ्लॉप होणार, पटोले -
नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे ‘हायवे मॅन’ चित्रपट फ्लॉप झाला, तसेच नितीन गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला. पटोले म्हणाले, विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला, कुठे गेले मिहान, नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. काँग्रेस एकजूट असून नागपूरमधून आ. विकास ठाकरे हे २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.