चिप लावल्याचा संशय लोकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : दहेगाव (रंगारी) येथील इंडियन आॅईल पेट्रोलपंपवर वजनमाप विभाग, ठाणे गुन्हे शाखा आणि पेट्रोलियम विभागाच्या चमूने संयुक्तपणे शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड टाकली. पल्सर चिपच्या सेटिंगमध्ये गडबड करण्यात आल्याच्या संशयावरून ही धाड टाकून तेथून दोन चिप जप्त करण्यात आल्या. त्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवाल आल्यानंतरच वजनमापात काटकसर केली जात होती की नाही, ते समोर येणार आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील पेट्रोल पंप तपासण्याचे आदेश वजनामापे विभागाला दिले आहेत. त्यानुसार पेट्रोल पंप तपासले जात आहेत. त्यात पेट्रोलियम कंपनीची मदत घेण्यात येत आहे. चिपचे उत्तर प्रदेश कनेक्शन असून या प्रकरणात ठाणे येथील गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवलीतून विवेक शेट्ये यास अटक केली. पेट्रोल पंपवर चिप लावून प्रोग्राम फिडिंग केल्यानंतर प्रती लिटरमागे २०० मिलिपर्यंत पेट्रोल कमी देण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची ही फसवणूक लक्षात घेता गुन्हे शाखा, वजनमापे विभाग आणि पेट्रोलियम विभागातर्फे राज्यभरातील पेट्रोल पंपावर धाडसत्र राबविण्यात येत आहे. या धाडीदरम्यान आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक केली. त्यात नागपूरच्या क्लेफर्ड थॉमस, सुरेश शंकर टेकाडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच दहेगाव (रंगारी) येथील अंबिकाप्रसाद शर्मा यांच्या इंडियन आॅईल पेट्रोल पंपावर धाड टाकण्यात आली. तेथे चौकशीदरम्यान अनुचित प्रकार आढळून आला नाही. मात्र पल्सरच्या चिपमध्ये गडबड केल्याचा संशय आल्याने ती तपासणीसाठी पाठविण्यात आली. तपासणी अहवालानंतरच पेट्रोलपंपावरील कारवाईबाबत योग्य पाऊल उचलले जाणार असल्याचे ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले. या कारवाईत अविराज कुऱ्हाडे, समीर अहिरराव, श्रीशेल चिवडशेट्टी, वजनमाप विभागाचे राधेश्याम चंदनखेडे, पंकज महाजन, जितेंद्र मोरे, पेट्रोलियम विभागाचे नीलेश कनोजिया, आशुतोष मांडवकर, खापरखेडा पोलीस स्टेशनचे पराग रामटेके आदींचा समावेश होता.
दहेगावच्या पेट्रोल पंपवर धाड
By admin | Published: July 01, 2017 1:53 AM