सेव्हन स्टारवर सक्तीची कारवाई करण्यास मनाई : हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 09:09 PM2020-09-09T21:09:41+5:302020-09-09T21:12:05+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सेव्हन स्टार हॉस्पिटलसह इतर संबंधितांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई व दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. परंतु, पोलिसांसाठी प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग मोकळा ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सेव्हन स्टार हॉस्पिटलसह इतर संबंधितांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई व दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. परंतु, पोलिसांसाठी प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग मोकळा ठेवला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या हॉस्पिटलवर १७ कोरोनाबाधित रुग्णांकडून सरकारी दरापेक्षा जास्त उपचार शुल्क घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, मनपाने रुग्णांचे ६ लाख ८६ हजार ५२७ रुपये परत करण्याचा हॉस्पिटलला आदेश दिला. तसेच, हॉस्पिटलवर ५ लाख रुपये दंड ठोठावला. त्यानंतर मनपाच्या झोन-५ चे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून हॉस्पिटलविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २९०, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५१ व ५३ आणि साथरोग कायद्यातील कलम ३ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. तो एफआयआर रद्द करण्यासाठी हॉस्पिटलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने हॉस्पिटलला वरीलप्रमाणे अंतरिम दिलासा दिला. तसेच सरकारला नोटीस बजावून यावर २८ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. हॉस्पिटलतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.