आॅनलाईन लोकमतनागपूर : राजस्थानमधील एका मुलीचे अपहरण करून तिला नागपुरात आणल्यानंतर दलालाने तिची गंगाजमुनातील वारांगनांना विक्री केली. दलालाकडून विकत घेतल्यानंतर आरोपींनी तिला नरकात डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला. लकडगंज पोलिसांनी रविवारी सायंकाळी या पीडित मुलीची सुटका करून तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.सुशीला लखन कालखोर (वय ३७), लखन विक्रम कालखोर (वय ४२). जया लखन कालखोर (वय २२) आणि कश्मिराबाई, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. तिला एका दलालाने फूस लावून दोन महिन्यांपूर्वी नागपुरात आणले. येथील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुनात सुशीला, लखन आणि जया या तिघांनी दलालाकडून या अल्पवयीन मुलीची खरेदी केली. त्यानंतर तिला कश्मिराबाईच्या अड्ड्यावरील एका निमुळत्या खोलीत डांबून तिच्याकडून ते जबरदस्तीने देहविक्रय करवून घेऊ लागले. तब्बल दोन महिन्यांपासून ती येथे नरकयातना भोगत होती. ही माहिती कळल्यानंतर लकडगंज पोलिसांनी रविवारी सायंकाळी कश्मिराबाईच्या कुंटणखान्यावर छापा घातला. येथून पीडित मुलीची सुटका केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या उपरोक्त चार आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.गरीब कुटुंबातील मुलगीपीडित मुलगी अत्यंत गरीब परिवारातील आहे. तिच्या आईवडिलांच्या पायांना व्याधी आहे. त्यामुळे ते दिव्यांगाचे जीवन जगतात. मुलगी दिसायला बरी असल्याचे पाहून दलालाने फूस लावून तिला नागपुरात आणले आणि येथे तिची विक्री केली होती, असे समजते.