नागपूर/भंडारा/गोंदिया : मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसानंतर संजय सरोवरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने पूर्वविदर्भात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढून पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा बसला आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असून वैनगंगा नदीला महापूर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील २० गावे अद्याप पाण्याखाली आहेत.मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शनिवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी आणि पवनी तालुक्यातील गावांना पुराचा विळखा पडला. अर्धे भंडारा शहर जलमय झाले आहे. मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यात काहींनी घरांच्या छतावर आश्रय घेतला होता. या गावांतील १,२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोंदिया तालुक्यातील ४० आणि तिरोडा तालुक्यातील १० गावांना पुराचा फटका बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीसह उपनद्यांना पूर आला आहे. देसाईगंजसह काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. सावंगी, धरमपुरी येथील ५२ कुटुंबाना स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. जिल्हयातील पाच प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कुलगावात पाणी शिरले.कोयना १०० टीएमसी पारसातारा : कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.नाशिकला गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गनाशिक : गंगापूर धरणातील जलसाठा ९४ टक्के झाला असून रविवारी दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूर मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. -राज्यात १७ टक्के अधिकचा पाऊसमुंबई : महाराष्टÑात तीन महिन्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत १७ टक्के अधिक तर मुंबई शहरात ६७ आणि उपनगरात ६५ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. सर्वच जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला.राज्यात या काळात सर्वसाधारणपणे ८०८.२ मिमी पावसाची नोंद होते. यावेळी ९४४.२ मिमी पाऊस झाला.नागपूर । ३६ गावांमध्ये बचावकार्यपेंच व तोतलाडोह जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे. एनडीआरएफने ३६ गावांमधील १४,२३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. कामठी कनान भागात पूरस्थिती कायम आहे. नागपूर जिल्ह्यात कामठी, पारशिवणी (कन्हान), कुही आणि मौदा तालुक्यांना पुराचा फटका बसला.पूरपरिस्थितीचा मी सातत्याने आढावा घेत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आहेत.- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्रीचंद्रपूर । ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटलाचंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रम्हपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रम्हपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.पाच राज्यांत स्थिती गंभीरमध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्येही सतत पाऊस पडत असल्याने तेथील नद्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांतून विसर्ग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शहरे व गावांत पाणी शिरले आहे.मध्य प्रदेशातील आठ धरणे १०० टक्के भरली आहेत. नर्मदेला पूर आला असून, त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरातमध्ये स्थिती बिकट आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्येही पावसाचा जोर सुरू आहे.
पूर्व विदर्भात पूरस्थिती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:09 AM