नागपूर : पंधरा-साेळा दिवसांची उघाड दिल्यानंतर या आठवड्यात चांगला पाऊस हाेईल, अशी अपेक्षा हाेती व तसा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला हाेता; मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. मंगळवारी विदर्भात सर्वत्र चांगला पाऊस हाेईल पण पुढे त्याचा जाेर ओसरेल. दाेन दिवस काही जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील पण त्यानंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस हाेण्याची शक्यता आहे.
मागील १५ दिवसांपासून विदर्भाकडून पावसाने नजर फिरविली आहे. एक-दाेन दिवस काही ठराविक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस वगळता हे दिवस बहुतेक जिल्ह्यात काेरडेच गेले. १६ व १८ ऑगस्टला विदर्भात सर्वत्र जाेरदार हजेरी लागली, त्यामुळे थाेडा दिलासा मिळाला. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला. आतापर्यंत नागपूर शहरात ७४५.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे, जी सरासरीच्या तुलनेत २० ते २५ मिमीने कमी आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत ताे कमी आहे. गडचिराेली जिल्ह्यात १९२.५ मिमी कमी पाऊस झाला आहे. याशिवाय गाेंदिया १८८.१ मिमी व अमरावतीत १८३ मिमी कमी पावसाची नाेंद आहे. हे प्रमाण सामान्य असले तरी समाधानकारक नाही. उघाडामुळे जलसाठे अपेक्षेप्रमाणे भरले नाहीत. विदर्भात जलसाठे ६०-६५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. म्हणजे सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमीच आहेत. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण हाेण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पश्चिम विदर्भ व आसपास कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. समुद्र सपाटीपासून ४ ते ५ किमी वर सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दाेन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मात्र ऊन-पावसाचा खेळ सुरू असून जाेरदार म्हणावा, असा बरसला नाही. सकाळपर्यंत नागपूर जिल्ह्यात ४२.१ मिमी पावसाची नाेंद झाली. वर्धा २९.४ मिमी, अकाेला २४.९ मिमी व गडचिराेलीत १६ मिमी पाऊस झाला. इतर जिल्ह्यात तुरळक पावसाची नाेंद झाली. मंगळवारी नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते, चांगल्या सरीही बरसल्या पण पुन्हा ऊन निघाले. त्यानंतर दिवसभर ऊन आणि पावसाचा खेळ चालला हाेता. पुढचे दाेन दिवसही जिल्ह्यात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र जाेर ओसरण्याची शक्यता आहे.