दोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरीलोकमत न्यूज नेटवर्कबुटीबोरी : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विदेशी दारू घेऊन जाणारी कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. पथकाने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १२ लाख एक हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. २८) सकाळी १०.१५ ते ११.४५ वाजतादरम्यान बुटीबोरी एमआयडीसी चौक येथे करण्यात आली. मुन्ना आनंदराव कांबळे (२३, रा. नागसेननगर, वर्धा) आणि बालू राजाभाऊ सावरकर (४९, रा. महादेवपुरा, वर्धा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, शंकर जनानी रा. वर्धा हा पसार झाला. बुटीबोरीकडून चंद्रपूर येथे विदेशी दारू नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांनी बुटीबोरी एमआयडीसी चौकात पथक तैनात केले. दरम्यान तेथे एमएच-१२/ईबी-९८१७ क्रमांकाची तवेरा गाडी आली. त्या वाहनाची तपाासणी केली असता त्यात वेगवेगळ्या विदेशी कंपनीच्या एकूण १०५६ बॉटल्स आढळून आल्या. त्यामुळे मुन्ना कांबळे आणि बालू सावरकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दारूसह कार असा १२ लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. ही कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, पोलीस हवालदार प्रमोद बन्सोड, दिलीप लांजेवार, पोलीस नायक रामा आडे, सुरेश गाते, पोलीस शिपाई विशाल चव्हाण यांनी पार पाडली. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ६५ (अ), (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, सहकलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार केशव राठोड करीत आहेत.
विदेशी दारूसह कार जप्त
By admin | Published: June 30, 2017 2:44 AM