लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.गडकरी यांची विविध विदेशी शिष्टमंडळांनी मानकापूरस्थित विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्यावतीने आयोजित ७९ व्या अधिवेशनात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गडकरी म्हणाले, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भारताचा भर आहे. त्यामध्ये देशातील रस्ते महामार्ग, रेल्वे, जहाजबांधणी, बंदरे, नद्यांमधून करण्यात येणारी जलवाहतूक, विमानतळे बांधणीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा उभारणी आणि त्यांचे बांधकाम, त्यात लागणारे साहित्य यामुळे गुंतवणुकीस प्रचंड वाव आहे. उज्ज्वल भारताच्या पायाभरणीत गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे. विदेशी गुंतवणुकीची ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ला गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी विदेशी शिष्टमंडळाने देशात गुंतवणूक करण्यात उत्सूक असल्याचे सांगितले. शाश्वत विकासासाठी त्यांच्या कंपन्याकडून विकास प्रक्रियेत रस्ते बांधणी, विमानतळे, बंदरे, जहाजबांधणी, रेल्वे बांधकाम आणि जलवाहतुकीसाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून बनविलेली असल्याचे सांगितले. या विदेशी शिष्टमंडळात इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, भूतान, अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, इटली, आॅस्ट्रिया, दुबई, इस्रायल यासह एकूण २२ देशांतील शिष्टमंडळांचा सहभाग होता.