लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर यांच्या विशेष पथकाने नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावर कारवाई करीत विदेशी दारूच्या अवैध वाहतूकदारासह अटक केली. त्याच्याकडून झायलाे व विदेशी दारू असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
कश्यप प्रेमलाल डहाट (४०, रा. सिराेंजी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर यांचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून सावनेरच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावर सावनेरपासून दाेन किमी अंतरावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
या पथकाने सावनेरच्या दिशेने येत असलेली एमएच-४०/एए-४३३० क्रमांकाची झायलाे थांबवून कसून झडती घेतली. त्यात त्यांना विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशी व कागदपत्रांच्या तपासणीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक कश्यम डहाट यास अटक केली. त्याच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीची झायलाे आणि आठ हजार रुपयांची विदेशी दारू असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस हवालदार नारायण बाेरकर यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार पुष्पपाल आकरे, प्रवीण निस्ताने, स्वप्निल ठाेंबरे, ज्याेती गाडीगाेणे यांच्या पथकाने केली.