ठळक मुद्देरशियन लीनाच्या अदांनी दर्शक घायाळ : स्पॅनिश नीराचा शास्त्रीय अंदाज
आॅनलाईन लोकमतनागपूर : एकीकडे स्पेनच्या नीरा सॉरेसने कथ्थकवर असा काही शास्त्रीय अंदाज पेश केला की दर्शकही मोहित झाले. दुसरीकडे रशियाच्या लीना ऊर्फ आया खासनाच्या मराठी लावणीवरील अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले. ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...’ म्हणत लीनाने स्टेजवर अशी काही जादू केली की येथे उपस्थित प्रत्येकाला तोंडात बोट घालायला भाग पाडले.नीरा सॉरेस तशी बॉलिवूड अॅक्ट्रेस, डान्सर आणि कोरिओग्राफरही आहे. विशेष म्हणजे तिने बनारसमधून कथ्थकचे शास्त्रीय प्रशिक्षणही घेतले आहे. विदेशी असूनही शास्त्रीय नृत्यात नीराने मिळविलेले कौशल्य तिच्या सादरीकरणातून स्पष्ट दिसत होते. तिची प्रत्येक मुव्हमेंट प्रेक्षकांना संमोहित करणारी होती. भारतीय परंपरेप्रमाणे ‘गाईये गणपती जगवंदना...’ या वंदनगीताने तिने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतरच्या प्रत्येक गीतावर तिची अदाकारी डोळ्यात भरणारी होती. या शास्त्रीय नृत्यात डोळ्यांचे हावभाव आणि अदाकारी महत्त्वाची असते. नीरा या सादरीकरणात कुठेही कमी नव्हती. तिच्या प्रत्येक स्टेप्सवर दर्शकांकडून टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. काही हिंदी चित्रपट गीतांवरही तिने शास्त्रीय अंदाजात डान्स सादर केला आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर...’चा प्रतिसाद तिला मिळाला. सादरीकरण संपूनही परत सादरीकरणासाठी तिला आवाहन केले गेले आणि तिनेही दर्शकांना नाराज केले नाही.दुसरीकडे फूड स्टॉलजवळच्या स्टेजवर बार्सिलोना(रशिया)च्या लीनाने आग लावली. ‘ती आली, ती नाचली आणि तिने जिंकले’ असाच काही हा परफॉर्मन्स होता. वर्णाने गोरीपान ही पोरगी मराठमोळ्या नऊवारीत ‘अप्सरा’सारखीच स्टेजवर अवतरली. लाल साडीमध्ये सजलेले तिचे ते विदेशी रूप डोळ्यात भरणारे आणि डान्सच्या अदा तर दर्शकांना ‘वाहवा...’ करायला लावणाऱ्या . ‘वाजले की बारा...’ या लोकप्रिय लावणीवर तिचे सादरीकरण तेवढेच कौशल्यपूर्ण होते. लावणीच्या तिच्या अदा पाहून उपस्थित प्रेक्षक भान हरपून तिच्या तालावर थिरकत होते. लावणी संपताच दर्शक एका स्वरात ‘वन्स मोअर...’ असे ओरडले. ती थांबली नाही. मात्र एका नव्या लावणीवर तिने दर्शकांचे अभिवादन स्वीकारले.