लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी वनविभागाला ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या सेवेत कायम सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने यंत्रणा कामाला लागली आहे.
मारुती चितमपल्ली यांनी वाढत्या वयोमानामुळे नागपूर-विदर्भातून आपला सर्व डेरा हलवत रविवारीच आपले मुळगाव सोलापूर गाठले आहे. मात्र, या वयातही त्यांची संशोधनाची प्रक्रीया थांबलेली नाही. सोलापूरमध्ये राहून ते जगासाठी अतिशय महत्त्वाचा असा वृक्षकोश तयार करत आहेत. त्याच अनुषंगाने राज्य वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सोलापूर रेंजच्या अधिकाऱ्यांना मारुती चितमपल्ली यांच्या सेवेत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. चितमपल्ली यांनी तयार केलेल्या ‘प्राणीकोश’, ‘मत्स्यकोष’, ‘पक्षीकोश’ आणि ‘वृक्षकोश’मध्ये अपडेटींगकरिता वनविभागाकडे असलेला कोश सादर करण्यासोबतच त्यांच्या संशोधनात मदत करण्याचे आवाहन म्हैसकर यांनी केले. त्यांच्याच निर्देशानुसार मारुती चितमल्ली यांचे रविवारी सोलापूरमध्ये आगमन होताच, सोलापूर वनविभागाचा संपूर्ण स्टाफ सोमवारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला. सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्त्वात यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि जंगलविषयक विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मारुती चितमपल्ली यांनी सोलापूरमधील नानस अभयारण्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.
मारुती चितमपल्ली यांनी विदर्भाच्या आपल्या ४०-४५ वर्षाच्या प्रदीर्घ सहवासात जंगलभ्रमंती करत अनेक संशोधन केले. नवेगावबांध, गोंदिया, मेळघाट, नागझिरा यासह अन्य वनविभागात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वातावरण, प्राणी, पक्षी, वृक्ष, मत्स्य अध्ययनात भरीव कार्य केले आहे. त्यांचे संशोधन हे जगातील वन अभ्यासकांसाठी अनन्यसाधारण असा ठेवा आहे. शनिवारीच त्यांना नागपूरकरांकडून प्रस्थान निरोप देण्यात आला.