लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात टी-१ वाघिणीच्या बछड्याच्या मृत्यूनंतर अन्य दोन बछड्यांच्या शोधासाठी सोमवारी शोध मोहीम राबविण्यात आली. यासाठी नागपुरातून श्वानपथक बोलावण्यात आले होते. कऱ्हांडला बीट क्रमांक १४१५ मधील घटनास्थळाच्या चारही बाजुंनी अर्धा किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला. मात्र दोन्ही बछड्यांचा पत्ता लागू शकला नाही.
हे वाघाचे बछडे कऱ्हांडला लगतच्या एफडीसीएम परिसरात असण्याची शक्यता वनकर्मचारी व्यक्त केली. यावरून या क्षेत्रात १५ पेक्षा अधिक ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले, तरीही बछडे दिसले नाहीत. यानंतर मंगळवारीही शोध मोहीम सुरूच होती. कऱ्हांडला येथील वाघ सूर्या (टी-९) याने सहा वर्षाच्या वाघाच्या बछड्याला मारल्याचा अंदाज आहे. हा मृत वाघ अभयारण्यातील कॉलर लावलेल्या टी-१ वाघिणीचा बछडा आहे. या घटनेनंतर तिचे दोन बछडे बेपत्ता आहेत
अभयारण्यातील वाघ धोक्यात
या अभयारण्यात मागील चार महिन्यात आतापर्यंत ७ बछडे आणि दोन वयस्क वाघांचा मृत्यू झाला आहे. कऱ्हांडलाचे मुख्य आकर्षण असणारा ‘जय’ वाघही आता बेपत्ता आहे. या घटनांवरून येथील वाघ धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.
रानकुत्र्यांची संख्या वाढली
कऱ्हांडला अभायरण्यात रानकुत्र्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. अनेकदा या कुत्र्यांमुळे त्रस्त झालेले वाघ आपले ठिकाण बदलवित असल्याचे दिसले आहे. रविवारी मृत आढळलेल्या बछड्याच्या मृत्यूमागे हे कारण असू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे.