नागपूर : वनविभागातील २७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी दुपारी निघाले आहेत. यात प्रधान मुख्य वनसंरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक या पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव यांची प्रशासकीय कारणावरून राज्याच्या जैवविविधता मंडळावर सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे. तर या पदावरील अधिकारी जित सिंग यांना प्रवीण श्रीवास्तव यांच्या खुर्चीवर बसविण्यात आले आहे. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर व्यवस्थापकीय संचालक या रिक्त पदावर एम. श्रीनिवासा राव यांची बदली करण्यात आली आहे. ते एफडीसीएममध्ये मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) या पदावर होते. राव यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांची बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) म्हणून पदोन्नती मिळाली आहे. ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांना संजीव गौड यांच्या रिक्त पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.
ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी या आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक असतील. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव यांना बॅनर्जी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर ठाणे येथे पाठविण्यात आले आहे.
यासोबतच राज्यातील वनसंरक्षक पदावरील सहा अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रामाराव यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर नाशिकहून वनसंरक्षक पी.जे. लोणकर यांची वर्णी लागली आहे. हे पद तात्पुरत्या स्वरूपात संवर्गात जोडल्याने लोणकर यांची पदस्थापना झाली आहे. पुणे येथील वनसंरक्षक (संशोधन) एस. एस. गुजर आता औरंगाबादला जात आहेत. नंदूरबार येथून उपवनसंरक्षक पी. बी. धानके हे ठाणे येथे वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) या पदावर, नागपूरचे उपवनसंरक्षक (भूमिअभिलेखा) व्ही.एम. गोडबोले यांना वनसंरक्षक (भूमिअभिलेखा) नागपूर या पदावर पदस्थापना मिळाली आहे. नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील उपवनसंरक्षक एस. डी. वाढई यांना वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) पदावर पदोन्नती मिळाली आहे.
उपवनसंरक्षक पदावरील १३ अधिकाऱ्यांच्यादेखील प्रशासकीय कारणावरून बदल्या करण्यात आल्या आहेत. कुंडल वन अकादमीमधील प्राध्यापक सी. एल. धुमाळ आता ठाणे येथील उपवनसंरक्षक (कार्य आयोजना) या पदावर जातील. वडसा येथील उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांची बदली गुगामल वन्यजीव विभागात करण्यात आली आहे. विवरेकर यांच्या रिक्त जागेवर साताऱ्याहून धरमवीर सालविठ्ठल बदलून जात आहेत.
नागपूरचे उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल यांना बल्लारपूर येथे उपवनसंरक्षक (वाहतूक व विपणन) येथे पदस्थापना मिळाली आहे. तर शुक्ल यांच्या रिक्त पदावर सातारा येथून उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा येत आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी एम. एन. मोहिते जात आहेत. डॉ. विनीता व्यास या कार्य आयोजना नागपृूर येथे, तर राहा येथील राकेश शेपट आता वर्ध्याचे उपवनसंक्षक असतील. शेपट यांच्या ठिकाणी अलिबागहून आप्पासाहेब निकत जात आहेत. अकोल्याचे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) विजय माने सांगलीला जात आहेत. अहमदनगरचे एम. आदर्श रेड्डी कांदळवनात विभागीय वन अधिकारी म्हणून जात आहेत, त्यांच्या रिक्त जागेवर सोलापूरच्या विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने जात आहेत. ठाणे एफडीसीएममधील विभागीय व्यवस्थापक कृष्णा भवर नंदूरबारला उपवनसंरक्षक म्हणून जाणार आहेत.
...
रेड्डी, शिवकुमारच्या जागेवरही नवे अधिकारी
हरिसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित झालेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार या दोघांच्याही रिक्त पदावर आता नवे अधिकारी येत आहेत. ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) ज्योती बॅनर्जी या रेड्डी यांच्या जागेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक म्हणून येत आहेत. तर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या रिक्त पदावर वडसा येथील उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांना पदस्थापना देण्यात आली आहे.
...