लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनक्षेत्रात जाणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकसारखा कचरा फेकण्यासाठी बंधन असले तरी वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे डब्यांमधून सर्रास प्लास्टिक कंटेनर फेकले जातात. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका संभवतो. मात्र, असे असतानाही रेल्वेने यासंदर्भात कसलीही दखल घेतलेली नसल्याने ही बाब धोकादायक ठरत आहे.
अनेक लोहमार्ग वनक्षेत्रातून जातात. अनेक मार्गांचे नॅरोगेजवरून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हे मार्गही वनक्षेत्रातूनच जातात. नव्याने आखण्यात येत असलेले मार्गही वनक्षेत्रातून जात आहेत. मात्र, वन क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे प्रवासात रेल्वेकडून कसलीही खबरदारी घेतली जात नाही. पर्यायाने खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कंटेनर, पाण्याच्या बाटल्या सर्रास खिडकीमधून बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असा कचरा साचलेला नेहमीच दिसून येतो. वनक्षेत्रात रेल्वे डब्यांमधून फेकल्या जाणाऱ्या पाकिटातील अन्न खाण्यासाठी डुक्कर, हरीण, कोल्हे, रानकुत्रे आदी प्राणी तसेच पक्षीही येतात. परिणामी रेल्वे ट्रॅकवर वन्यजीवांचा बळी जातो.
होशंगाबादच्या प्रवासात इटारसीच्या रेल्वे थांब्यावर पेन्ट्री असल्याने प्रवाशांना पाकिटात अन्न दिले जाते. पुढच्या प्रवासात होशंगाबाद, सातपुडा परिसरात जंगलच आहे. जेवणानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर अन्नाची पाकिटे, कंटेनर फेकले जातात. असाच प्रकार अन्य ठिकाणीही आहे. एसी कोचमध्ये असा प्रकार घडत नसला तरी साधारण श्रेणींच्या डब्यांमध्ये हा प्रकार घडतो. रेल्वे प्रवाशांकडून स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. रेल्वेचेही याबाबतीत फारसे नियंत्रण नाही. यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असली, तरी ती फारशी गांभीर्याने घेतली जात नाही, ही खरी अडचण आहे.
...
कोट
रेल्वे प्रवाशांकडून नियमभंग होत असतानाही वन विभाग आणि रेल्वे खाते गंभीर नाही. एकीकडे वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी नियम आखले जात असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. परिणामी रेल्वे ट्रॅकवर वन्यजीवांचे मृत्यू होत आहेत. वन विभाग आणि रेल्वे खात्याने यावर संयुक्तपणे मार्ग काढावा. संबंधित प्रवाशांना दंड केला जावा. रेल्वे डब्यांमध्ये कचऱ्यासाठी कंटेनर ठेवले जावे.
- प्रफुल्ल भांबुरकर, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, महाराष्ट्र समन्वयक
...
कोट
हा विषय गंभीर आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी लाईन चेकिंग करताना याची दक्षता घ्यायला हवी. वनक्षेत्रात त्यांच्याकडून स्वच्छता होणे अपेक्षित आहे. यात काही तांत्रिक अडचणी असल्या तरी मार्ग काढता येईल. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)