नागपूर: गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती व वाघ यांच्यामुळे होणाऱ्या संपत्तीच्या नुकसानाबाबत सेमिनरी हिल्स येथील वन विभागाच्या हरी सिंह सभागृह येथे मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, सुभाष धोटे यांच्यासह प्रधान सचिव (वने) बी. वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शैलेंद्र टेंभूर्णीकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, नागपूर मुख्य वनसंरक्षक लक्ष्मी, गडचिरोली मुख्य वनसंरक्षक एस. रमेश कुमार तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीचा दोन तृतीयांश भाग जंगलाने व्यापलेला आहे. मागील काही वर्षांत २३ हत्तींचा कळप येथे आलेला आहे. या कळपामुळे येथील घरांचे नुकसान होत आहे. या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच हत्तींमुळे काढणी केलेल्या धान तसेच शेतमालाचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत तरतूद करावी, अशी सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.