लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे आणि क्षेत्र सहायक जीवन पवार हे गुरुवारी सकाळी खुर्सापार परिसरातील जंगलात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना काही अंतरावर दुर्गंधी आल्याने त्यांनी शोध घेतला. काही अंतरावर त्यांना वाघाच्या बछड्याचा पाय आढळून आला. त्यापासून काही दूर अंतरावर त्याचे शरीर व अन्य अवयव आढळून आले.सर्व अवयव शाबूत असल्याचे प्रवीण साठवणे यांनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे यांनी सांगितले की, तो बछडा अंदाजे एक वर्षाचा असून, त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने त्याची याच परिसरातील वाघाने शिकार केली असावी.कोणताही वाघ त्यांच्या परिसरात दुसऱ्या वाघाचे किंवा त्यांच्या बछड्यांचे वर्चस्व सहसा प्रस्थापित होऊ देत नाही. त्यातून या बछड्याला वाघानेच मारले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. हा बछडा ‘अवनी’ वाघिणीचा असल्याचीही चर्चा होती.माहिती मिळाल्यानंतर वनसंरक्षक गोवेकर यांनी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घटनास्थळाला भेट दिली. मात्र, त्यांनी या संदर्भात काहीही सांगण्यास नकार दिला.
नागपूरनजिकच्या जंगलात वाघाच्या बछड्याचे सहा तुकडे आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:21 AM
मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देमानसिंगदेव अभयारण्यातील प्रकार