‘ड्रेस कोड’ गुंडाळला : शिस्त कोलमडलीजीवन रामावत नागपूरवन विभागाची ‘खाकी’ ही शान आहे. अभिमान आहे. एक रुबाब आहे. शिवाय शिस्तीचे प्रतीक आहे. मात्र वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या ‘खाकी’ गणवेशाचीच ‘अॅलर्जी’ असल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने पोलिसांच्या धर्तीवर आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी खाकीतील ‘ड्रेस कोड’ तयार केला आहे. तो वनरक्षकापासून तर वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी (आरएफओ) अनिवार्य करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, गणवेश हा शिस्त शिकवितो आणि कोणतीही फौज म्हटले की, शिस्त ही आलीच. त्यानुसार वन अधिकारी व कर्मचारी ही वन विभागाची फौज आहे. त्यामुळेच या सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे अधिकार आणि दर्जा प्रदान करण्यात आला आहे. वन विभागातील वनपालाला (फॉरेस्टर) पोलीस उपनिरीक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला पोलीस निरीक्षकाचा दर्जा दिला गेला आहे. शिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांना आपल्या खाकी वर्दीवर स्टार लावण्याचा मान दिला आहे. मात्र असे असताना वन विभागातील हे अधिकारी व कर्मचारी खाकी गणवेशात का दिसत नाही? असा सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय आहे. येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्यासह सर्वच वरिष्ठ वन अधिकारी बसतात. तसेच झिरो माईल्स येथे नागपूर वनवृत्ताचे मुख्यालय असून, येथेही मुख्य वनसंरक्षकांसह (सीसीएफ) डझनभर वरिष्ठ अधिकारी बसतात. या उपरोक्त या दोन्ही कार्यालयात कधीच वन अधिकारी वा कर्मचारी गणवेशात दिसत नाही. खरं तर गणवेश हा वन विभागाची ओळख आहे. वरिष्ठांची मूक संमती सध्या वन विभागातील परिस्थिती पाहता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या मुजोरीला मुख्यालयातील वरिष्ठांची मूक संमती असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात खुलेआम साध्या गणवेशात वावरताना दिसून येतात. एवढेच नव्हे तर अनेक जण वरिष्ठांसमोर बसून चर्चाही करतात. जाणकारांच्या मते, सर्वप्रथम वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (आरएफओ) वर्दीकडे पाठ फिरविली आहे. वन विभागातील कोणताही आरएफओ हा एखाद्या समारंभाचा अपवाद वगळता कधीच गणवेशात दिसत नाही. विशेष म्हणजे, हा अधिकारीच गणवेश वापरत नसल्याने त्याच्या अधिकारात काम करणारा वनपाल आणि वनरक्षक सुद्धा गणवेश वापरत नाही. यात आरएफओ साहेबच वर्दीत नसल्याने ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही. यातून मागील काही वर्षांत वन विभागातील ‘खाकी’ हरवली की काय? असे चित्र दिसू लागले आहे.
वन अधिकाऱ्यांना खाकीची ‘अॅलर्जी’
By admin | Published: September 09, 2016 3:05 AM