लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बऱ्याच कालावधीनंतर राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले आहे. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वगळता इतर ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. कोरोनामुळे हा परिणाम जाणवत असून दिवाळीनंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात निसर्ग पर्यटनाला प्रारंभ झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात मार्च महिन्यासृून निसर्ग पर्यटन बंद होते. जुलै महिन्यात पर्यटनाला परवानगी मिळाली असली तरी महाराष्ट्रातील वन पर्यटन पावसाळ्य्यात बंद असल्याने ते ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये निसर्ग पर्यटन सुरू होते. ऑक्टोबरमध्ये कोअरमधील पर्यटन सुरू झाल्यापासून तिथे बऱ्यापैकी प्रतिसाद दिसत आहे. पर्यटकांचाही ओघ चांगला असून ही परिस्थिती दिवाळीनंतर अधिक चांगली होईल, असशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
केवळ या ठिकाणची स्थिती वगळता अन्य ठिकाणी मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नाही. बोर अभयारण्यातील दोनपैकी एकच गेट उघडण्यात आले आहे. मार्गात नाल्याला पाणी असल्याने अडेगाव गेट अद्यापही बंद आहे. पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला येथेही म्हणावा तसा ओघ दिसत नाही. पेंच प्रकल्पातील खुर्सापार गेटवर पर्यटकांचा प्रतिसाद मात्र बरा आहे.
टिपेश्वर अभयारण्यात कोरोना संक्रमणामुळे अधिक खबरदारी घेतली जात आहे. अन्य ठिकाणी एका जिप्सीमध्ये चार पर्यटकांना सफारी करण्याची परवानगी असली तरी येथे मात्र एका जिप्सीतून दोघांनाच सफारीची परवानगी आहे. त्यामुळे जिप्सीच्या खर्चाचा भुर्दंड पडत असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांमध्ये व्यक्त आहेत आहे.
पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी वाढली आहे. महाराष्ट्राबाहेरील पर्यटकही येण्यास इच्छुक आहेत. त्या तुलनेत विदेशी पर्यटकांकडून यंदा प्रथमच प्रतिसाद कमी जाणवत आहे. चौकशी होत असली तरी बुकिंग करण्याच्या मानिसकतेत पर्यटक नसल्याचा रिसॉर्टचालकांचा अनुभव आहे.
ऑक्टोबर महिना असला तरी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही. कोरोनाच्या संसर्गाची भीती लक्षात घेता आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. दिवाळीनंतर पर्यटनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
- रविकिरण गोवेकर, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प तथा मुख्य वनसंरक्षक.