लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरातील वनक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र गणना वर्ष २०१८ नुसार २९६७ वाघांचा अधिवास आहे. यात महाराष्ट्रात वर्ष २०१४ च्या गणनेनुसार १९० वाघांची संख्या होती. ही संख्या वाढून ३१२ वर पोहोचल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राने वर्ष २०१८ च्या वाघांच्या गणनेनंतर वाघांच्या संख्येत ६४ टक्के वाढ नोंदविली आहे.राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने राज्यातील आकडे जाहीर केले. परंतु प्रत्येक राज्यात क्षेत्रनिहाय वाघांच्या संख्येचा अहवाल जारी केला नाही. महाराष्ट्रातील वन विभागातील तज्ज्ञांच्या मते, राज्यातील ९० टक्के संरक्षित वनक्षेत्र विदर्भात आहे. विदर्भात ताडोबा, मेळघाट, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्पासह नवेगाव, नागझिरा, उमरेड-कऱ्हांडला, कोका अभयारण्य आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेले वनक्षेत्र आहे. अशास्थितीत विदर्भातील जंगलातच वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विदर्भात वाघांच्या प्रजननात ९० ते ९५ टक्के वाढ होऊन वाघांची संख्या २९५ झाल्याचा अंदाज आहे. सूत्रानुसार वर्ष २०१४ च्या व्याघ्र गणनेनंतर महाराष्ट्रात १९० ते १९५ वाघांची संख्या असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्याचे विश्लेषण केल्यानंतर विदर्भात वाघांची संख्या १८० नोंदविण्यात आली होती. महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात वाघांचे क्षेत्र असलेल्या यावल (खान्देश) आणि सह्याद्री टायगर रिझर्व्ह(पश्चिम महाराष्ट्र)मध्ये एकूण वाघांची संख्या ५ टक्के म्हणजे १० ते १५ वाघ असल्याचे नमूद करण्यात आले होते. यावर्षी २०१८ च्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या २७० ते ३५४ पर्यंत असल्याचा अंदाजे आकडा जारी करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्रात ३१२ च्या आकड्यानुसार विदर्भात २९५ वाघ असल्याचा अंदाज आहे. मागील व्याघ्र गणनेचा अहवाल घोषित झाल्यानंतर सहा महिन्यांनी ‘एनटीसीए’ने वाघांच्या संख्येचे आकडे जारी केले होते. परंतु यावेळी एनटीसीएच्या सूत्रानुसार विभागनिहाय अहवाल तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.वन कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ‘राज्यात वाघ वाढल्याचे श्रेय वन कर्मचाऱ्यांना आहे. त्यांनी दिवस-रात्र सुरक्षा करून वनक्षेत्राचे रक्षण केले. यासोबत बफर आणि संरक्षित क्षेत्रातून गावकऱ्यांचे इतरत्र पुनर्वसन मोठ्या प्रमाणात होऊ शकले. यामुळे वाघांचे क्षेत्र वाढून प्रजननासाठी अतिरिक्त वनक्षेत्र उपलब्ध होऊ शकले. विदर्भात अधिक जंगल असल्यामुळे या क्षेत्रात ९० टक्के वाघांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे.’नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)