नागपूर : नागपूर वन विभागांतर्गत वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया हाेऊन निवड झालेल्या उमेदवारांची यादीसुद्धा साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आश्चर्य म्हणजे नागपूर वन विभागाला याची खबरबातही नाही. धक्कादायक म्हणजे यादीवर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मनीषकुमार यांचे हस्ताक्षरही आहेत. अशाने मॅसेज व्हायरल करून निवड झालेल्या उमेदवारांची फसवणूक केली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे प्रकरण वन विभागाच्याही नजरेत आले आहे. त्यामुळे २०२१ मध्ये अशाप्रकारची काेणतीही भरती प्रक्रिया विभागाने घेतली नसल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे. साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीशी वन विभागाचा काही संबंध नाही आणि मनीषकुमार हे नागपूर वनवृत्ताचे उपवनसंरक्षक नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले. व्हायरल यादीनुसार कुणीही वन विभागात नाेकरी देण्याचे आमिष दाखवीत असेल तर नागरिकांनी अलर्ट राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे. या प्रकरणात नागपूर वन विभागाने सायबर पाेलिसांकडे अज्ञात व्यक्तीविराेधात तक्रार दाखल केली आहे.
नागरिकांनी सतर्क असावे : हाडा
नागपूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांनी साेशल मीडियावर व्हायरल हाेत असलेल्या वनरक्षक भरतीसंबंधित यादीशी वन विभागाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सायबर पाेलिसांकडे तक्रार दाखल केली असून, आराेपींना लवकरच पकडल्या जाण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र नागरिकांनीही अशा बाेगस दाव्यांवर विश्वास न ठेवता फसवणूक हाेण्यापासून स्वत:ला वाचवावे, असे आवाहन डाॅ. हाडा यांनी केले.