मालकास अटक : वाडी पोलिसांची कारवाई, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्तवाडी : दुसऱ्या कंपनीच्या ‘ट्रेड मार्क’चा उपयोग करून बाजारात बनावटी स्नॅक्सचे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपनीवर वाडी पोलिसांनी धाड टाकली. त्यात मशीन व पॅकेट असा अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जपत करण्यात आला असून, कंपनी मालकास अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. नरेश अशोकलाल चेलानी (रा. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. श्रीराम कॉलनी जलपली, हैदराबाद येथील मेहुल जिगरअली हिराणी (२७) यांच्या मालकीची प्रो आॅफ राजाराजेश्वरी फूड नामक स्नॅक कंपनी असून, या कंपनीद्वारे ‘मालामाल’ नावाचे स्नॅक्सचे उत्पादन देशभरात विकले जाते. गुलशन अर्जुनदास जेठवानी रा. नागपूर हे महाराष्ट्रातील या कंपनीच्या उत्पादनाचे अधिकृत वितरक आहेत. सदर स्नॅक्स त्यांच्यामार्फत शहरातील व बाहेरील दुकांनामध्ये विक्रीला पाठविले जातात. दरम्यान, काही दिवसांपासून या कंपनीच्या स्नॅक्सच्या विक्रीत घट येत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने वितरक गुलशन जेठवानी यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी याच नावाचे बनावटी स्नॅक्स बाजारात उपलब्ध असून, त्या स्नॅक्सचे उत्पादन अशोका इंडस्ट्रीज, वाडी, नागपूर येथे केले जात असल्याची माहिती त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिली. परिणामी, हिराणी यांना नागपूरला येऊन या स्नॅक्सची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे वितरकाने दिलेल्या माहितीमध्ये सत्यता असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी शुक्रवारी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सदर कंपनी व गोदामावर धाड टाकली आणि तिथून स्नॅक्सची पाकिटे व मशीन असा अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक योगेश खरसान, अजय पाटील, संदीप पाटील, सुशील गवई, प्रवीण बावरसकर, ज्योती भिकुंडे आदींनी केली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
बनावट स्नॅक्स कंपनीवर धाड
By admin | Published: January 17, 2016 2:56 AM