लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद स्वीकारले त्यावेळी मासिक वेतन केवळ आठ हजार रुपये होते. त्या काळात वकिली व्यवसायातून या वेतनाच्या दहापट कमाई करीत होतो. असे असताना न्यायमूर्ती झालो, पण त्या निर्णयाचा आयुष्यात कधीच पश्चाताप वाटला नाही. उलट हे सर्वोच्च पद भूषवून मनाला शांतीच लाभली, असे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी सोमवारी प्रकट मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ‘असा मी घडलो’ या शीर्षकाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात ही मुलाखत घेण्यात आली. दरम्यान, सिरपूरकर यांनी त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला. सिरपूरकर यांची १९९२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. १९९७ मध्ये त्यांची मद्रास उच्च न्यायालयात बदली झाली. २००४ मध्ये त्यांना उत्तरांचल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी कार्य केले. २००७ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. तेथून ते २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची न्यायमूर्तीपदावरील कारकीर्द यशस्वी राहिली. त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकरणांवर प्रभावशाली निर्णय दिले. कलकत्ता येथील कालीमाता मंदिरामध्ये त्यांच्या निर्णयामुळे शिस्त लागली. काही लोकांच्या तीव्र विरोधामुळे ते प्रकरण बरेच गाजले होते.विविध न्यायालयांत कार्य करण्याचा अनुभव असलेले सिरपूरकर यांनी नागपुरातील वकिलांच्या गुणवत्तेचा गौरव केला. असे अभ्यासू वकील कुठेच आढळून आले नाहीत, असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्तींच्या कार्यकुशलतेमध्ये मुंबई उच्च न्यायालय तर, न्यायिक कर्मचाऱ्यांच्या सेवावृत्तीमध्ये मद्रास उच्च न्यायालय चांगले असल्याची माहिती त्यांनी दिली.वकील म्हणून यशस्वी होण्यात आई-वडील, अॅड. सखाराम खेर्डेकर, अॅड. सरंजामे, बॅरि. बाबासाहेब फडके, वरिष्ठ अधिवक्ता अरविंद बोबडे, वरिष्ठ अधिवक्ता बाबासाहेब मनोहर, वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे व मित्रांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांकडून काही ना काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा वकिली करताना झाला. परंतु, पहिले गुरू आई-वडीलच होते असे सिरपूरकर यांनी सांगितले. अॅड. गौरी वेंकटरामन यांनी त्यांची मुलाखत घेतली. व्यासपीठावर वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गोरडे व संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.लॉयर बाय चॉईसआई-वडील दोघेही वकील असले तरी त्यांनी आपल्यावर वकील होण्याचा दबाव कधीच आणला नाही. आठवीमध्ये शिकत असताना वकील होण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार पुढील मार्गक्रमण केले, अशी माहिती सिरपूरकर यांनी दिली.कोर्टातच केले प्रपोजपत्नीला कोर्टातच लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर तिने उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा वेळ घेतला होता. ती आई-वडिलांच्या संमतीनेच लग्न करणार होती. त्यामुळे होकाराची प्रतीक्षा करावी लागली होती, असे सिरपूरकर यांनी सांगितले.पहिली केस हरलोउच्च न्यायालयातील पहिली केस हरलो होतो. ती दिवाणी पुनर्विचार याचिका होती. त्या केसकरिता २५ रुपये फी मिळाली होती. ती केस आजही विसरलो नाही, असा पहिल्या प्रकरणाचा अनुभव सिरपूरकर यांनी सांगितला.
दहापट कमाई विसरून झालो न्यायमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 10:38 PM
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद स्वीकारले त्यावेळी मासिक वेतन केवळ आठ हजार रुपये होते. त्या काळात वकिली व्यवसायातून या वेतनाच्या दहापट कमाई करीत होतो. असे असताना न्यायमूर्ती झालो, पण त्या निर्णयाचा आयुष्यात कधीच पश्चाताप वाटला नाही. उलट हे सर्वोच्च पद भूषवून मनाला शांतीच लाभली, असे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी सोमवारी प्रकट मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले.
ठळक मुद्देविकास सिरपूरकर यांची प्रकट मुलाखत : सर्वोच्च पद भूषवून मनाला लाभली शांती