नागपूर : वेद आपल्या परंपरेतील मौलिक ठेवा असून, त्यात भौतिक व आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार आहे. वस्तुत: हे ज्ञान सुरुवातीपासूनच सर्वांसाठी वाटायला हवे होते. मात्र, या ज्ञानाची सूत्रे मर्यादित वर्गाच्या हातात होती. त्यांच्या हाती आले तेवढे ज्ञान वाचले. जर तेव्हाच सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा मिळाली असती तर वेदांचे ज्ञान पूर्णत: संग्रहित झाले असते. मात्र, असे न झाल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर पडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. धात्रे नम: ट्रस्टतर्फे आयोजित ‘वेदिक फिलॉसॉफिकल रेमिडिज’ या पुस्तक प्रकाशनादरम्यान ते गुरुवारी बोलत होते.
अहल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, लेखक डॉ. चेन्ना केशव शास्त्री प्रामुख्याने उपस्थित होते. जे मुळात वैज्ञानिक आहेत, त्यांना विज्ञानापलीकडेदेखील जगात खूप काही आहे याची जाणीव आहे. काही लोक वेदांना नाकारतात, तर काही विज्ञानाला नाकारतात. मात्र, हे दोन्ही अतिवादी प्रयोग आहेत. असे केल्याने असंतुलन निर्माण होते व त्यातून विकृती निर्माण होते. याचे परिणाम समाजासाठी घातक असतात. आपल्या परंपरेतील ज्ञानाचे अंश अतिवादीपणामुळे नाकारले गेले. आपणदेखील त्यांना मान्य केले. त्यामुळे बरेचसे पारंपरिक ज्ञान लुप्त झाले. परकीय शक्तींना याचा फायदा घेतला व आपल्या मनात आपल्याच ज्ञानाबाबत न्यूनगंड निर्माण झाला, असे सरसंघचालक म्हणाले.
शेकडो वर्षांच्या परंपरा नाकारू शकत नाही
विज्ञान व अध्यात्म हे परस्परविरोधी आहे हा अतिवादी दृष्टिकोन अयोग्य आहे. या दोन्ही बाब परस्परपूरक असू शकतात. विज्ञानातून या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वेदांमधील वर्णनातून ड्राय सेलची निर्मिती
आपले वेद ज्ञानाचे भंडार आहेत. आत्मसाक्षात्कारापासून ते अगदी शिल्पकलेपर्यंतची सूत्रे त्यात आहे. वेदिक गणित आज जगातील मोठ्या विद्यापीठांमध्ये शिकविले जात आहे. विज्ञान भारतीच्या काही संशोधकांनी वेदांमधील वर्णनातून ड्राय सेल तयार केले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.आजचे जग ज्या भाषेत समजते, त्या भाषेत ती मांडायला हवी.