नागपूर : एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी. त्यात ऐक्यासंबंधीचा आराखडा तयार करावा, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी रविवार येथे व्यक्त केले. रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आठवले यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यावर टीका केली. एका धर्माचा आदर करीत असताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. गोवंशमुळे हजारो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे या कायद्यातून ‘वंश’ हा शब्द गाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. १९७६ पासून हा कायदा आहे. परंतु युती शासनकाळात गोवंश हत्या बंदीचा कायदा तयार करण्यात आला होता. तो कायदा सध्या मंजूर करण्यात आला आहे. गोवंश मुळे भाकड बैलांची कत्तल करणे हासुद्धा गुन्हा ठरणार आहे. भाकड बैलांना पाळणे हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. तसेच त्याच्या मांस विक्री व चामड्यांचा उद्योगांचे मोठे अर्थशास्त्र आहे. लाखो लोक बेरोजगार होणार आहे. यासंबंधात आरपीआयतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून या कायद्यातील वंश शब्द काढण्याची मागणी करण्यात येईल. केंद्रातील भूसंपादनाच्या कायद्यात ७० टक्के सहमतीची अट कायम ठेवण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना शेत मजुरांचाही विचार करावा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आरपीआयचा पूर्वीपासूनच विरोध आहे. या विषयावर आम्ही शिवसेनेसोबत आहोत. तर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही भाजपसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आरपीआयतर्फे २० मे रोजी यवतमाळ येथे आदिवासी हक्क परिषद आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता महायुती पाच वर्षांचा कार्यकाळ पूण करेल असा दावा त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बन्सोड, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रिपाइं ऐक्यासाठी समिती स्थापन व्हावी
By admin | Published: April 13, 2015 2:24 AM