नागपूर : तळमळीच्या कार्यकर्त्यांशिवाय कोणत्याही संघटनेला यश नसते. झोकून देणाऱ्या, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून संघाप्रति तळमळ जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच मराठा सेवा संघाचे रूप आज व्यापक आणि लढाऊ झाले आहे. यात वक्ते, लेखक, कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध कार्यालयातील अधिकारी, राजकीय नेते, शेतकरी बांधव, उद्योजक, व्यावसायिक यांचा भरीव वाटा आहे, असे भावोद्गार संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा. दिलीप चौधरी यांनी काढले.
मराठा सेवा संघाच्या स्थापनेला ३१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बळीराजा संशोधन केंद्रात आयोजित वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे होते. प्रमुख पाहुणे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, जिजाऊ सृष्टी प्रमुख पुरुषोत्तम कडू, माजी प्रदेश उपाध्यक्ष रमेश बोरकुटे, जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके, कार्याध्यक्ष श्याम डहाके आदी प्रमुख पाहुणे होते.
दिलीप चौधरी पुढे म्हणाले, मराठा सेवा संघ वाढविण्यात प्रत्येकाचा हातभार आहे. प्रत्येकाचे कार्य आणि योगदान प्रचंड आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत असणाऱ्या जिगरबाज अधिकाऱ्यांनी मिळून मराठा सेवा संघाची स्थापना केली. झपाटल्यासारखे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. वाढीसाठी जाणीवपूर्वक कसोशीने प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
अध्यक्षीय भाषणात मधुकर मेहकरे म्हणाले, संभाजी ब्रिगेड राजकारणामध्ये पाय घट्ट रोवत आहे. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्यभर कार्य पसरवीत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचेही देशभर व्यापक काम सुरू आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजाचे बदलते स्वरूप संपूर्ण महाराष्ट्र व देश अनुभवत आहे. रवींद्र ठाकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून दिलीप खोडके यांनी ३१ वर्षांच्या काळातील मराठा सेवा संघाच्या कार्याचा लेखाजोखा मांडून समाजात घडलेला बदल सांगितला. कार्यक्रमाला सुरेंद्र उगले, पंकज निबाळकर, प्रमोद वैद्य, सुनीता जिचकार, जया देशमुख, प्रताप पटले, अमोल हाडके, अनुप मुरतकर, शिरीष गोळे, वैभव शिंदे, संदीप पोटपिटे, विक्की जवंजाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.