लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सभागृहात १० टक्के सदस्य संख्या असलेल्या पक्षाची सर्वपक्षीय समन्वय समिती गठित करण्याची घोषणा आमसभेत केली. समितीचे काम मनपा अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कोरोना संक्रमितांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करण्याचे राहील. येणाऱ्या २४ ऑगस्ट रोजी समितीची बैठक होईल. समितीच्या बैठकीत सभागृहात उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्यांवर चर्चा करण्यात येईल, असे निर्देश महापौरांनी आमसभेदरम्यान दिले. याच दरम्यान सभागृहाची प्रत्यक्ष कारवाई ऑनलाईन करण्यासंबंधी पत्रावर माजी महापौर प्रवीण दटके व काँग्रेस नगरसेवक संदीप सहारे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात यावे, असे सांगितले. यावर महापौर यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांसोबत बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आमसभा तांत्रिक कारणाने स्थगित करण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा सभा सुरू झाली. अर्धा तासाच्या कारवाईनंतर पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी कोरोनाच्या बाबतीत असलेल्या अव्यवस्थेवर व मनपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांचा प्रस्ताव सादर करण्यादरम्यान अनेक अडचणी आल्या. शेवटी महापौर जोशी हे नेटवर्क व कनेक्टीव्हीच्या मुद्यावरून नाराज झाले. सदस्य आपले मत मांडू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी प्रशासनाला प्रश्न केला की, सुरक्षित अंतर ठेवून बैठक होऊ शकते का?, २५ टक्के सदस्यांच्या उपस्थितीत २८ ऑगस्ट रोजी सभा घेण्याच्या प्रस्तावाला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य सरकारच्या आदेशाचा दाखला देत खारीज केले होते.
सभेच्या कारवाई दरम्यान आवाज येत नसल्याने सदस्य त्रस्त झाले. नगरसेवक प्रफुल्ल गडधे म्हणाले की स्थगन प्रस्तावाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. परंतु आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे एका समन्वय समितीचे गठन करणे गरजेचे आहे. समितीच्या माध्यमातून नगरसेवक व अधिकारी कोरोना संबंधित मुद्यांवर चर्चा करू शकतील. महापौरांनी समिती बनविण्यास सहमती दर्शविली.सत्तापक्ष नेता संदीप जाधव म्हणाले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या सभेत जनतेच्या मुद्यावर चर्चा होऊ शकत नाही. राज्याच्या नगर विकास विभागाच्या उपसचिवाला सभागृहातील कार्यवाहीबाबत आदेश देण्याचे अधिकार आहे का? याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे आवश्यक आहे. यावर महापौर म्हणाले की, सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, संदीप सहारे यांनी सभागृहाची प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली.- हे आहेत समिती सदस्यमहापौर संदीप जोशी (अध्यक्ष), उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, धर्मपाल मेश्राम, वीरेंद्र कुकरेजा, सुनील अग्रवाल, नरेंद्र बोरकर, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, संजय बंगाले, प्रफुल्ल गुड़धे, संदीप सहारे, संजय महाकाळकर, वैशाली नारनवरे, दुनेश्वर पेठे, किशोर कुमेरिया, आभा पांडे.