नागपूर : दीड वर्षापासून महापालिकेतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यापासून, त्यांच्या प्रभागातील समस्यां वाढत चाललेल्या आहेत. निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्यामुळे सोमवारी भाजपाच्या माजी नगरसेवकांनी महापालिकेत धरणे दिले.
भाजपाच्या माजी नगरसेवकांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील समस्येंचा पाढा मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यापुढे मांडला. गडरलाईन वारंवार चोक होत असून, घाण पाणी सार्वजनिक ठिकाणी वाहत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला असून, नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नवीन गडरलाईन टाकणे, दुरूस्ती करणे, चेंबर दुरुस्त करणे, नवीन बनविणे यासंदर्भात निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
उद्यान विभागाला झाडे कापण्याविषयी तक्रारी केल्या, फोनवरूनही सांगितले पण झाडांची कापणी झाली नाही. झाडे कापण्याचे टेंडर झाले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. प्रभागामध्ये रस्ते, उद्यान, मैदानाची सफाई होत नाही. उद्यानातील ग्रीन जीम बिघडलेल्या आहेत. शहरातील बहुतांश परिसरातील स्ट्रीट लाईट बंद आहे. प्रत्येक प्रभागात २०० सफाई कर्मचारी असतानाही नियमित सफाई होत नाही, अशा तक्रारीचे निवेदन माजी नगरसेवकांनी आयुक्तांना दिले.आंदोलनात माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजीनगरसेवक बाल्या बोरकर, पिंटू झलके, संदीप जाधव, रुपाली ठाकूर, स्वाती आखतकर आदी उपस्थित होते.