लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार माधव गोविंद (मा.गो.)उपाख्य बाबुराव वैद्य (९७) यांचे निधन झाले. पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात त्यांची देशभरात ओळख होती. त्यांच्या निधनामुळे संघ वर्तुळात शोककळा पसरली आहे.
११ मार्च १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेल्या मा.गो.वैद्य यांनी शैक्षणिक क्षेत्रातदेखील कार्य केले होते. १९४६ ते १९६६ या कालावधीत न्यू ईरा हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, कुर्वेज न्यू मॉडेल येथे शिक्षक तर मॉरिस कॉलेज व हिस्लॉप कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्य केले. १९६६ मध्ये ते पत्रकारितेत आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जात व त्यांनी अनेक मोठे पत्रकारदेखील घडविले. १९७८ ते १९८४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्यदेखील होते.
संघाच्या मुशीतच घडलेले मा.गो.वैद्य यांनी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, अखिल भारतीय प्रवक्ता या जबाबदाऱ्यादेखील सांभाळल्या होत्या. याशिवाय २००८ सालापर्यंत ते संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाचे निमंत्रित सदस्यदेखील होते. साहित्य क्षेत्रातदेखील त्यांनी ठसा उमटविला होता व २२ पुस्तकांचे लेखन केले होते.
रविवारी सकाळी अंत्यसंस्कार
मा.गो. वैद्य यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू या तीन मुली, संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन, धनंजय, श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम ही पाच मुले, नातवंडे आहेत. प्रतापनगर येथील त्यांच्या राहत्या घरून रविवारी सकाळी ९.३० वाजता अंत्ययात्रा निघेल व अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार होतील.