पंतप्रधान मोदींंबद्दल अपमानास्पद वक्तव्य; काँग्रेस नेत्याविरुद्ध भाजपची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 02:44 PM2022-06-14T14:44:46+5:302022-06-14T17:10:33+5:30
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य. भाजपची की गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी शेख हुसेन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात आपत्तिजनक विधान केले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी आज गिट्टीखदान पोलीस स्टेशचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. 1/2@narendramodipic.twitter.com/sGefWou2Gs
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 14, 2022
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. काल नागपुरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान नागपूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. शेख हुसेन यांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके यांनी केली आहे.
अमरावतीतही तक्रार दाखल
याप्रकरणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी व माजी शहराध्यक्ष जयंत डेहणकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई व तत्काळ अटक करावी अशी मागणी या तक्रारीद्वारे केली आहे.