मोयना : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व मोयना येथून भाजप उमेदवार अशोक डिंडावर प्रचारादरम्यान हल्ला करण्यात आला. रोड शोदरम्यान हा हल्ला झाला. निवडणूक आयोगाने या हल्ल्याची दखल घेतली असून, जिल्हा प्रशासनाकडून तातडीने अहवाल मागितला आहे.
मोयना बाजार येथे रोड शो सुरू असताना सायंकाळी ४.३० च्या सुमारास काही गुंडांनी लाठी व रॉडने हल्ला केला. त्यांनी डिंडाच्या वाहनावर दगडफेकदेखील केली. या हल्ल्यात डिंडाला खांद्यावर जखम झाली. हल्ला करणाऱ्यांमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता, असा आरोप दिंडाच्या प्रचार चमूकडून लावण्यात आला आहे. तृणमूलने यात त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. भाजपमधीलच काही असंतुष्टांनी डिंडावर हल्ला केला आहे, असा दावा तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अखिल गिरी यांनी केला आहे.