एसआयटीकडे तक्रार : ग्वालबन्सीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा दाखल होणार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या नातेवाईक तसेच साथीदारांविरुद्ध तक्रारीचा ओघ सुरूच आहे. या भूमाफियांनी सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी आणि उद्योजकांची जमीन हडपल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. नव्या तक्रारीनुसार, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी यांचीही जमीन भूमाफिया ग्वालबन्सीने हडपल्याचे उघड झाले आहे. कृष्णराव परतेकी हे माजी उपमहापौर असून, १९९५ ला त्यांनी हजारीपहाड येथील वेलकम सोसायटीत भूखंड घेतला होता. या सोसायटीत १४ सभासद होते. या सोसायटीची दीड एकर जागा होती. त्यामध्ये भूखंड पाडण्यात आले होते. ग्वालबन्सी, पिल्लेवार याने त्यावेळी अन्य भूमाफियांसोबत संगनमत करून या भागातील भूखंड हडपण्याचा सपाटा लावला होता. वेलकम सोसायटीतील तीन भूखंड हडपल्याच्या तक्रारी आतापर्यंत गुन्हे शाखेचे एसीपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे आल्या आहेत. याच वेलकम सोसायटीत नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी यांचेही काही भूखंड आहे. यातील कोल्हे नावाच्या महिलेचा नगरसेवक ग्वालबन्सीने भूखंड हडपल्याची तक्रार एसआयटीकडे यापूर्वीच आली आहे. आता माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी यांनीही पिल्लेवार याच्याकडून विकत घेतलेला भूखंड हडपल्याची तक्रार एसआयटीकडे दिली आहे. एसआयटी या प्रकरणाचीही चौकशी करीत आहे. लवकरच त्यासंबंधाने गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी लोकमतला दिली
माजी उपमहापौरांची जमीन बळकावली
By admin | Published: May 30, 2017 1:46 AM