नागपूर : देशाची प्रमुख दहशतवाद विरोधी तपास संस्था ‘एनआयए’च्या लोगोत ‘राष्ट्ररक्षणम आद्यकर्तव्यम’ हे ब्रीदवाक्य झळकते आहे. हे ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी पोलिस महासंचालक (निवृत्त) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाज विघातक शक्तीचा नायनाट करतानाच पोलिस दलातील आपली संपूर्ण कारकीर्द ‘कम्युनिटी पुलिसिंग’साठी वापरणारे पोलिस अधिकारी म्हणून डॉ. उपाध्याय ओळखले जातात, हे विशेष!
भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण दहशतवादी हल्ला ठरलेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर एनआयए अस्तित्वात आली. देशाची प्रमुख दहशतवाद विरोधी तपास संस्था म्हणून एनआयए काम करते. १३ वर्षे झालेल्या या तपास यंत्रणेचा लोगो तयार झाला होता. मात्र, त्यात ‘बोध (ब्रीद)वाक्य’ (ज्या प्रमाणे पोलिसांचे ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ आहे, तसे) नव्हते.
एनआयएचे ध्येय आणि मूल्यांचा सार दर्शविणारे ब्रीदवाक्य या लोगोत असावे, असा संबंधित शीर्षस्थांचा सूर होता. त्यामुळे ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी बरेच मंथन झाले. अनेक अधिकारी अन् संबंधितांची त्याअनुषंगाने चर्चाही झाली. तथापि, साजेशा बोधवाक्यावर एकमत होत नव्हते. डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी असले तरी पोलिस दलातील त्यांची उभी हयात समाजसेवेचा वसा जपण्यात गेली.
इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या उपाध्याय यांचा साहित्य, संस्कृती आणि कलेशीही नजीकचा संबंध आहे. ते व्यासंगी लेखक, उत्तम कवी अन् वक्ते म्हणूनही सर्वत्र परिचित आहेत. ते लक्षात घेता एनआयएचे महासंचालक आयपीएस सदानंद दाते यांनी डॉ. उपाध्याय यांच्याशी एप्रिल २०२४ मध्ये संपर्क केला. त्यानंतर काही दिवसांतच ‘राष्ट्ररक्षणम आद्यकर्तव्यम’ तयार झाले आणि एनआयएच्या लोगोमध्ये हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले.
गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून लोकार्पण
संबंधित शीर्षस्थांकडून ‘राष्ट्ररक्षणम आद्यकर्तव्यम’ या ब्रीदवाक्याची प्रशंसा झाली अन् त्याला मान्यताही मिळाली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ७ नोव्हेंबर २०२४ला त्याचे अनावरण करून एनआयएच्या लोगोसह या ब्रीदवाक्याचेही लोकार्पण केले.
एनआयए महासंचालकांकडून आभार
हे ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल एनआयएचे महासंचालक, आयपीएस सदानंद दाते यांनी डॉ. उपाध्याय यांना एक पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली आहे. संस्थेच्यावतीने मोटो आणि एनआयएची टाय असलेले मोमेंटो सादर करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून राष्ट्रीय तपास संस्थेला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉ. उपाध्याय यांचे आभारही व्यक्त केले आहेत.