नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिमा चांगली आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांना चांगले ओळखतो. कोणाला तरी वाचविण्यासाठी त्यांचा बळी दिला जात आहे. त्यामुळे त्यांनी माफीचा साक्षीदार होऊन कायद्याला साथ द्यावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अनिल देशमुख ज्या प्रकरणात फसले आहेत, त्या प्रकरणात त्यांना उगाच गोवले जात आहे. पैसे देणारे पुढे आले आहेत. विभाग म्हणतो, कलेक्शन झाले आहे. चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसा मिळालेला नाही; पण हे पैसे कुणाला तरी गेले आहेत. जे काही पैसे जमले आहेत ते कुणाकडे नेऊन पोहोचविले. कोणाकडे ते गेले, याचा खुलासा देशमुख यांनी करावा.
या प्रकरणात त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, माफीचा साक्षीदार झाल्यास त्यांची सुटका होऊ शकते. या प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही राजाला किंवा वजिराला पुढे आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यावर विचार करणे गरजेचे आहे. आंबेडकर म्हणाले की, दिवाळीनंतर फटाके फुटणार म्हणून सांगण्यात येत होते. फटाके फुटायला लागले अशी परिस्थिती आहे; पण महत्त्वाचा फटाका कधी फुटतोय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
राजकारण झाले व्यावसायिक
राजकारण एकेकाळी सेवा म्हणून बघितले जात होते. आता व्यावसायिक झाले आहे. त्यातून राज्यालाच लुटले जात आहे. त्यामुळे न्यायालयाची भूमिका आता महत्त्वाची झाली आहे. न्यायालयापुढे असलेली राजकीय भ्रष्टाचाराची प्रकरणे ताबडतोब निकाली काढावीत. त्या प्रकरणाला लटकवून ठेवू नये. राजकारणात व्यावसायिकीकरण घुसले आहे. गुन्हेगारी वाढली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.