लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात एकूण ६१ हजार १४१ प्रकरणे निकाली काढली. त्यात ५३ हजार ९०४ दिवाणी तर, ७ हजार २३७ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.ही माहिती न्यायालयातील सूत्रांकडून मिळाली असून त्याला नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय व्यवस्थापक अंजू शेंडे यांनी दुजोरा दिला. माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून २७ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. शेवटच्या दिवशी त्यांनी नागपूर खंडपीठात कार्य केले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने पब्लिक ट्रस्ट मालमत्तेसंदर्भातील प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यांनी नागपूर खंडपीठातून सर्वाधिक ५० हजार ७७ प्रकरणे निकाली काढली. त्यात ४६ हजार ९ दिवाणी तर, ४ हजार ६८ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी औरंगाबाद खंडपीठातून ५ हजार ७९५ दिवाणी व १० फौजदारी अशी एकूण ५ हजार ८०५, मुंबई मुख्यालयातून १ हजार ७६६ दिवाणी व ३ हजार १२३ फौजदारी अशी एकूण ४ हजार ८८९ तर, पणजी (गोवा) खंडपीठातून ३३४ दिवाणी व ३६ फौजदारी अशी एकूण ३७० प्रकरणे निकाली काढली.धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विशेष न्यायिक कामकाज करता आले नाही. परंतु, त्यांनी प्रशासकीय सूत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले. त्याची सर्वत्र प्रशंसा झाली.बेंच प्रकरणेमुंंबई ४,८८९ (दिवाणी-१,७६६, फौजदारी-३,१२३)नागपूर ५०,०७७ (दिवाणी-४६,००९, फौजदारी-४,०६८)औरंगाबाद ५,८०५ (दिवाणी-५,७९५, फौजदारी-१०)पणजी ३७० (दिवाणी-३३४, फौजदारी-३६)एकूण ६१,१४१ (दिवाणी-५३,९०४, फौजदारी-७,२३७)