नागपूर : माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर जैन रुग्णालयात उपचार सुरू होते. ते १९७७ व १९९४ असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते. गत काळात नागपूर शहराचे राजकारण त्यांच्या आजूबाजूलाच फिरत होते.
एकेकाळी महापालिकेत ‘किंग मेकर’ची भूमिका बजावणारे अटलबहादूर सिंग यांची, दिलेला शब्द पाळणारा आणि जात-धर्माच्या पलीकडचा दिलदार माणूस अशी ओळख होती. ते १९७४ -७५ मध्ये उपमहापौर होते. व त्यानंतर १९७७-७८ व १९९४-९५ असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते.
त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात मनपातर्फे राष्ट्रपतींचा नागरी सत्कार, तसेच व्हीसीए मैदानावर लता मंगेशकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यांनी नागरी सत्काराची परंपरा सुरू केली. तसेच समुहगाण स्पर्धेला सुरुवात केली. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक वर्तूळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलदार मित्र गमावला - नितीन गडकरी
नागपूर शहराचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनामुळे एक जिवश्च-कंठश्च आणि दिलदार मित्र आपण गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक संदेशात व्यक्त केली आहे. कधीही जात-धर्म-पंथ या भेदांत न अडकलेले अटलबहादूर हे माझ्यासाठी मित्र आणि सुहृद होते. त्यांचा-माझा संबंध दीर्घकाळापासूनचा होता. आमची मैत्री पक्षातीत होती व शेवटपर्यंत टिकली. एक अनमोल मित्र गमावल्याचे अपार दुःख मला झाले आहे, असेही गडकरी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने नागपूरचे कला-सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारा, शहराच्या विकासासाठी नितांत कळकळ असलेला आणि प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.