नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि सध्या नगरसेवक असलेले किशोर रामाजी डोरले यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने शुक्रवारी आरोपी पिता-पुत्रास दोन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. इंद्रपाल ऊर्फ रज्जू हिरालाल शाहू आणि त्याचा मुलगा प्रमोद इंद्रपाल शाहू दोन्ही रा. बिनाकी मंगळवारी कोलबास्वामीनगर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये राजेश इंद्रपाल शाहू, महेश ऊर्फ पप्पू इंद्रपाल शाहू आणि भूपेंद्र ऊर्फ बबलू इंद्रपाल शाहू यांचा समावेश आहे. किशोर डोरले हे बिनाकी मंगळवारी प्रभाग १४ चे नगरसेवक आहे. १९९३-९४ मध्ये ते महापौर होते. २७ आॅक्टोबर २०१२ रोजी सकाळच्या वेळी ते आपल्या वॉर्डात निरीक्षण करीत असताना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कोलबास्वामीनगर शाहू मोहल्ल्यातील बारानल चौकात आरोपी इंद्रपाल शाहू आणि त्याची चार मुले ही नीळकंठ चना पोहेवाला याच्यासोबत नाश्त्याचा ठेला लावण्यावरून भांडण करीत असताना त्यांना दिसले होते. डोरले यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. नीळकंठ हा आपला नाश्त्याचा ठेला केवळ दोनच तास लावून कुटुंबाचे पालनपोषण करतो, त्याला ठेला लावू द्या, असे डोरले यांनी म्हणताच इंद्रपाल शाहू आणि त्याच्या चार मुलांनी गैरकायद्याची मंडळी जमवून डोरले यांच्या डोक्यावर आणि पोटावर भाल्याचे पाते व गुप्तीने वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले होते. मोहल्ल्यातीलच काही कार्यकर्त्यांनी गंभीर अवस्थेतील डोरले यांना मोटरसायकलने यशोदरानगर पोलीस ठाण्यात नेले होते आणि त्यानंतर मेयो इस्पितळात दाखल केले होते. या प्रकरणी यशोदरानगर पोलिसांनी भादंविच्या १४७, १४८, १४९, ३०७ (खुनाचा प्रयत्न), शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक ए. सी. मोहनकर यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. एम. देवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. (प्रतिनिधी) भोसकून दुखापतीचा गुन्हा सिद्धन्यायालयात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्यांवरून आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाला नाही. केवळ दोन आरोपींविरुद्ध भादंविच्या ३२४ (भोसकून दुखापत)चा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे तर आरोपींच्या वतीने अॅड. ओ. डब्ल्यू. गुप्ता आणि अॅड. नीतेश समुंद्रे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल नामदेव पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.
माजी महापौर डोरले यांच्यावरील खुनी हल्ल्यात दोघांना शिक्षा
By admin | Published: February 27, 2016 3:26 AM