लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी महापौर नंदा जिचकार यांनी मुलाच्या लग्नाच्या मंडपासाठी रस्त्याच्या बाजूला १५० चौ.फूट मंडपाची परवानगी महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनकडून घेतली होती मात्र त्यांनी संपूर्ण रस्त्यावर मंडप उभारून दोन दिवस रस्ता बंद ठेवला. यामुळे वस्तीतील नागरिकांचा रस्ता बंद झाला. परिणामी येथील नागरिकांनी झोन कार्यालयाकडे तक्रार केली. याची दखल घेत जिचकार यांना पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.
जिचकार यांनी प्रतापनगरातील आपल्या निवासस्थानी रस्त्याच्या बाजूला १५० चौ. फूट जागेत मंडप उभारण्याची परवानगी घेतली होती. १९ आणि २० डिसेंबरसाठी दोन दिवसाचे ७५० रुपये शुल्कही भरले होते. परंतु त्यांनी १५० चौ. फूट जागेऐजी संपूर्ण रस्त्यावर मंडप उभारला होता. या तक्रारीची दखल घेत झोन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी तात्काळ पथक पाठविले व दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, सोनेगाव वाहतूक विभागाने त्यांचे पती निवृत्त आरटीओ अधिकारी शरद जिचकार यांनाही नोटीस बजावली आहे.