नागपूर : क्रिस्टल केअर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दिलीप कडेकर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप लावत माजी महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी पाचपावली पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले.
रुग्णालयाविरोधात २० दिवसांअगोदर तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र तरीदेखील संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली नाही. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनपाकडून अभिप्राय मागण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मृत कडेकर यांची पत्नी, बहीण, आई यांच्यासमवेत नातेवाईक उपस्थित होते. १२ मे रोजी कडेकर यांच्या नातेवाईकांनी क्रिस्टल रुग्णालयाकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याची माझ्याकडे तक्रार केली होती. पैसे न दिल्याने रुग्णालयाने औषधे देणे बंद केले. आठ दिवस कडेकर व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आले व त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तक्रारीनंतरदेखील पोलिसांनी कारवाई केली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनीदेखील कुठलेच पाऊल उचलले नाही. शहरातील ८० टक्के रुग्णालय चांगले काम करीत आहेत. परंतु २० टक्के रुग्णालय लोकांची लूट करीत आहेत, असा आरोप जोशी यांनी लावला.