माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 10:25 AM2022-06-04T10:25:39+5:302022-06-04T10:38:31+5:30
Haribhau Naik : नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. कामगारांबद्दल आस्था असणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता गमावल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
हरिभाऊ नाईक हे आपल्या नैतिक मूल्यांसाठी ओळखले जात. ते महाराष्ट्राचे माजी कामगार राज्यमंत्री होते. यासह, नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, आयएलओ जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपुर व मुंबईचे माजी अध्यक्ष तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काम केले.
त्यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम, घाट रोड नागपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.