माजी मंत्री नितीन राऊत कॉंग्रेस ‘एससी’ विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:10 PM2018-03-27T21:10:18+5:302018-03-27T21:10:30+5:30
राज्याचे माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी’ विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी के.राजू यांच्या जागेवर राऊत यांची ही नियुक्ती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी’ विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी के.राजू यांच्या जागेवर राऊत यांची ही नियुक्ती केली आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती जारी केली. विशेष म्हणजे नितीन राऊत यांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीतून वगळले होते. परंतु दिल्लीतूनच त्यांचे पुनर्वसन झाले असल्यामुळे राऊत यांनी प्रदेशाध्यक्षांवर मात केली असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे.
राऊत यांच्या या निवडीमुळे राष्ट्रीय पातळीवर नागपूरला परत एकदा स्थान मिळाले आहे. राऊत यांच्या निवडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मी काँग्रेस पक्षाची निष्ठा, विचार कधीच सोडला नाही. त्याचे चीज झाले आहे. पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. २०१९ च्या निवडणुकीत या संधीचे सोने करेन. तसेच समाजात आंबेडकरी विचारांची पेरणी करण्याचे काम मी अविरत करत राहील, असे मत डॉ.नितीन राऊत यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केले.