आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हात पकडून ताब्यात घेत असलेल्या एका महिला पोलिसांच्या अंगावर यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया धावून गेले. त्यांनी महिला पोलिसांवर डोळे काढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल पदयात्रा काढली. ही पदयात्रा नागपूर शहरात आज सकाळी दाखल झाली. नेत्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर पदयात्रा थांबवून रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे नागपूर-वर्धा-चंद्रपूर महामार्गावरची वाहतूक रखडली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वातावरण तणावपूर्ण झाले. रखडलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलक नेत्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, नेत्यांनी दाद दिली नाही म्हणून महिला पोलिसांनी खा. सुप्रिया सुळे यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांसोबत झटापट सुरू झाली. हात मुरळगला गेल्याने खा. सुळे यांना दुखापत झाली. तरी महिला पोलीस त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी एका महिला पोलिसांना धमकावत तिच्या हातातून खा. सुळे यांचा हात सोडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस आणि नेत्यांमध्ये काही वेळ गरमागरमीही झाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही नेते यांनी समंजस भूमिका घेतल्याने वातावरण शांत झाले. याप्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून माजी आ. बाजोरिया यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही गुन्हा रात्री ७ वाजेपर्यंत सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेला नव्हता.रुग्ण आणि नातेवाईकांची कुचंबणाहल्लाबोल पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी अचानक रास्ता रोको सुरू केल्यामुळे नागपूर-वर्धा-चंद्रपूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची तीव्र कुचंबणा झाली. चिचभवन पुलापासून मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद असल्याने आधीच वाहतुकीची कोंडी होत आहे. तशात रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या शेकडो वाहनातील हजारो प्रवासी तसेच अॅम्बुलन्स अडकून पडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचीही कोंडी झाली. अनेक जण रडकुंडीला आले. अॅम्बुलन्सचा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. काही वाहनचालकांना दमदाटी करून तर काहींवर बळाचा वापर करीत पोलिसांनी अॅम्बुलन्सचा मार्ग मोकळा केला.पोलिसांतील पालक जागृतरस्ता रोकोमुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणारी अनेक वाहने वाहनांच्या गर्दीत फसली. यायला-जायला काहीच जागा नसल्याने घामाघूम अवस्थेत वाहनात बसून राहण्यापलीकडे विद्यार्थी काही करू शकत नव्हते. बाहेरगावाहून नागपुरात परीक्षा देण्यासाठी आलेल्या काही परीक्षार्थ्यांचाही समावेश होता. खापरीत त्यांचे वाहन अडकले. त्यामुळे तेथून पायी चालत दोन विद्यार्थिनी आंदोलनस्थळी आल्या. सोनेगावचे ठाणेदार संजय पांडे यांना त्यांनी आपली अडचण सांगितली. पेपरची वेळ झाली. छत्रपती चौकातील संताजी महाविद्यालयात जायचे आहे अन् जायला कोणतेच वाहन नाही, असे सांगून त्या रडू लागल्या. यावेळी पांडे यांच्या बाजूला पोलीस शिपायी संजय जाधव उभे होते. त्यांनी लगेच आपली मोटरसायकल काढून त्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात पोहचवून दिले.