लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघस्थानी येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून संघ स्वयंसेवकांमध्येदेखील या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नागपुरात १४ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारदेखील केला असून ते कार्यक्रमाला येणार आहेत. यावेळी मंचावर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील उपस्थिती राहणार असून ते स्वयंसेवकांना उद्बोधन करतील. दरम्यान, संघाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी पत्रिकादेखील छापून झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संघाकडून अधिकृत वक्तव्यदेखील करण्याचे टाळण्यात येत आहे.‘काँग्रेस कनेक्शन’मुळे ‘दक्ष’ पवित्राप्रणव मुखर्जी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी त्यांची राजकीय जडणघडण काँग्रेसच्या मुशीतूनच झाली आहे. संघ परिवार आणि भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर प्रहार करण्यात येत आहे. कधी नव्हे ती संघाकडून जाहीरपणे काँग्रेसच्या राजकारणावर टीका करण्यात आली. भाजपाच्या नेत्यांकडून तर काँग्रेसमुक्त भारताचे नारेच लावण्यात येत आहेत. अशा स्थितीत प्रणव मुखर्जी यांचे संघस्थानी येणे ही बाब काँग्रेसच्या ‘हायकमांड’ला कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. त्यामुळेच ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द होऊ नये यासाठी संघाने मुखर्जी यांच्या उपस्थितीच्या घोषणेबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. संघाच्या कार्यक्रमांना विरोधी विचारधारेतील व्यक्तींना बोलविण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. संघाच्या बऱ्याच कार्यक्रमात विरोधकांनी येऊन मंचावरून आपले विचार मांडले असल्याचे दाखले उपलब्ध आहेत.तृतीय वर्ष वर्ग असतो ‘खास’संघाच्या प्रणालीत तृतीय वर्ष वर्गाचे महत्त्वाचे स्थान असते. दरवर्षी रेशीमबागला होणाºया समारोप कार्यक्रमाला देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती असते. मागील वर्षी नेपाळचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल रुक्मांगुद कटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याअगोदर कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार संघस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:04 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देतृतीय वर्ष वर्ग समारोपाला राहणार मुख्य अतिथीसरसंघचालकांचीदेखील राहणार उपस्थिती