लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : घर कराचा पूर्णपणे भरणा केल्याशिवाय कराची पावती देता येत नाही, असे सांगताच माजी सरपंच व त्यांच्या मुलाने ग्रामपंचायत कर्मचारी (चपराशी) याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. राग अनावर झाल्याने दाेघांनीही चपराशाला बेदम मारहाण केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेडा येथे शुक्रवारी (दि.१७) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
गौतम चिंतामण नकोसे (३०, रा. गुजरखेडी, ता. सावनेर) असे मारहाण करण्यात आलेल्या चपराशाचे तर नामदेव रामराव राऊत (४८) आणि आदित्य नामदेव राऊत (२३) दाेघेही रा. वाघोडा, ता. सावनेर अशी मारहाण करणाऱ्या माजी सरपंच व त्यांच्या मुलाचे नाव आहे. गाैतम निकाेसे हे वाघाेडा ग्रामपंचायतमध्ये चपराशीपदी कार्यरत आहेत. माजी सरपंच नामदेव राऊत व त्यांचा मुलगा आदित्य राऊत शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आले हाेते.
या दाेघांनीही गाैतम निकाेसे यांना कराची पावती मागितली. त्यावर पूर्ण कराचा भरणा करा. कराचा भरणा केल्याशिवाय पावती देता येत नाही, अशी सूचना गाैतम निकाेसे यांनी करताच दाेघेही संतापले आणि त्यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. वाद विकाेपास गेल्याने या दाेघांनीही गाैतम निकाेसे यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी दाेघांविरुद्ध भादंवि ३५३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक आशिषसिंग ठाकूर करीत आहेत.